ग्रामपंचायतींमध्ये केवळ १० टक्के ज्येष्ठांना मतदारांनी दिली संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:01 IST2021-02-05T08:01:29+5:302021-02-05T08:01:29+5:30
जिल्ह्यातील ४७५ पैकी २६ ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाली, तर ४७८ सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. ४४६ ग्रामपंचायतींच्या ३,६९८ जागांसाठी ...

ग्रामपंचायतींमध्ये केवळ १० टक्के ज्येष्ठांना मतदारांनी दिली संधी
जिल्ह्यातील ४७५ पैकी २६ ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाली, तर ४७८ सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. ४४६ ग्रामपंचायतींच्या ३,६९८ जागांसाठी मतदान झाले. ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून, १२,३३२ पैकी ४,१४४ उमेदवारांनी विजय मिळविला. यंदा मोठ्या प्रमाणात महिला व तरुण उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले होते. यात केवळ १० टक्के ज्येष्ठ उमेदवारांनी सहभाग घेतला होता.
जालना तालुक्यात ज्येष्ठांचे वर्चस्व
जिल्ह्यातील जालना तालुक्यात सर्वाधिक ज्येष्ठ उमेदवार आहेत. तालुक्यात तब्बल ११ टक्के ज्येष्ठ उमेदवार निवडून आले आहेत. मतदारांनी महिला व तरुण उमेदवारांबरोबरच ज्येष्ठ उमेदवारांनाही पसंती दिली आहे.
ग्रामपंचायतीत मी आता तिसऱ्यांदा निवडून आलो आहे. या अगोदर मी सरपंच पदावर असताना गावात अनेक विकासात्मक योजना राबविल्या. जनतेने पुन्हा एकदा माझ्यावर विश्वास टाकला आहे. या विश्वासाला तडा न जाऊ देता गावचा पाणीप्रश्न, गावांतर्गत स्वच्छता, विविध शासकीय योजनांचा सर्वसामान्यांना लाभ मिळवून देणे आदी कामांना आपण प्राधान्य देणार आहोत.
विष्णू जमधडे, ग्रामपंचायत सदस्य, टेंभुर्णी.
ग्रामपंचायत सदस्या म्हणून मी प्रथमच निवडून आले आहे. ग्रामीण भागात आजही महिला ग्रामसभेत पाहिजे तसा सहभाग नोंदवित नाही. त्यामुळे महिला हिताचे अनेक प्रश्न ग्रामस्तरावर नेहमीच दुर्लक्षित राहतात. मी महिलांमध्ये जनजागृती करून गावच्या ग्रामसभेत अधिकाधिक महिला कशा उपस्थित राहील यासाठी प्रयत्न करेन. उन्हाळ्यात गावातील पाणीप्रश्न नेहमीच उग्ररुप धारण करतो. अशावेळी महिलांना पाण्यासाठी दूरवर भटकंती करावी लागते. गावचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रामुख्याने प्रयत्न करीन.
पंचफुला फलके, ग्रामपंचायत सदस्या, तपोवन गोंधन
माझे वय सध्या ७० वर्षे असून, मी टेंभुर्णी ग्रामपंचायतीतील सर्वात ज्येष्ठ सदस्या आहे. निवडणूक प्रथमच लढली असली तरी माझ्या वैयक्तिक जीवनातील अनुभवांचा मला ग्रामपंचायत सभागृहात निश्चितच फायदा होणार आहे. या ग्रामपंचायतीत १० महिला सदस्या असल्याने ज्येष्ठ सदस्या म्हणून माझी जवाबदारी नक्कीच वाढली आहे. दारूमुळे अनेक महिलांचे संसार उदध्वस्त होत आहे. त्यामुळे गावात दारूबंदी करण्यासाठी महिला सदस्यांच्या सहकार्याने आपण पुढाकार घेणार आहोत.
चंद्रभागा सोनसाळे, ग्रामपंचायत सदस्या, टेंभुर्णी.