मतदारांचा कौल युवा उमेदवारांकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:32 IST2021-01-19T04:32:35+5:302021-01-19T04:32:35+5:30
जाफराबाद : तालुक्यातील १६ ग्रामपंचायतींची मतमोजणी प्रक्रिया सोमवारी येथील तहसील कार्यालयात पार पडली. या मतमोजणीच्या निकालानंतर मतदारांनी युवकांना कौल ...

मतदारांचा कौल युवा उमेदवारांकडे
जाफराबाद : तालुक्यातील १६ ग्रामपंचायतींची मतमोजणी प्रक्रिया सोमवारी येथील तहसील कार्यालयात पार पडली. या मतमोजणीच्या निकालानंतर मतदारांनी युवकांना कौल दिल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे, या निकालातून अनेक प्रस्तापितांना मतदारांनी ग्रामपंचायतीच्या बाहेर ठेवत धक्का दिल्याचे स्पष्ट झाले आहे.
यंदा तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा आखाडा चांगलाच पेटला होता. निवडणुकीच्या आखाड्यात अनेक नव मतदारांनी उडी घेतल्याने चुरस चांगलीच वाढली होती. तालुक्यात अनेक ग्रामपंचायत मध्ये विविध पक्षाचे समर्थक उमेदवार एकमेकांसमोर उभे होते. तर काही ठिकाणी विरोधही एकत्रित लढल्याने मतदरांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली होती. देळेगव्हाण येथे भाजपच्याच दोन पॅनलमध्ये झालेल्या लढतीत भाजपचे जिल्हा सरचिटणिस गोविंदराव पंडित, प्रकाश कापसे यांच्या पॅनलला डावलून भाजपचे दत्तू पंडित, भगवान बनकर यांच्या पॅनलचे सर्व अकरा सदस्य विजयी झाले आहेत. तर भराडखेडा ग्रामपंचायतीत जिल्हा परिषद अध्यक्ष उत्तमराव वानखेडे यांच्या पत्नी लक्ष्मीबाई वानखेडे या विजयी झाल्या आहेत. तपोवन गोंधन ग्रामपंचायतीच्या चुरशीच्या निवडणुकीत कविता माधव डोमाळे या केवळ एक मताने निवडून आल्या आहेत. वरुड (बु.) मध्ये शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख रमेश गव्हाड यांच्या पॅनलला केवळ तीन जागेवर समाधान मानावे लागले आहे. जवखेडा ठेंग येथे विद्यमान पंचायत समिती सदस्य प्रभाकर अवकाळे यांच्या पॅनलला केवळ तीन जागा, तर टेंभुर्णी ग्रामपंचायतमध्ये देखील प्रस्थापित ग्रामपंचायत सदस्यांना सत्तेपासून दूर रहावे लागले आहे.
दरम्यान, मतमोजणी यशस्वी करण्यासाठी तहसीलदार सतीश सोनी, नायब तहसीलदार केशव डकले, विवेक पाटील, शिरीष वसावे, ओमकार बोडखे, एस. टी. पठाण, एम.एस. पाकळ, एस. बी. काबरे, टी. ई. गावंडे, यू. के. धर्माधिकारी, एस. एम. मुथा, व्ही. व्ही. शिंगणे, डी. डी. गोत्राणी, वाघमारे आदींनी परिश्रम घेतले. सपोनि अभिजित मोरे, ज्ञानेश्वर पायघण, युवराज पोठरे व इतरांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.