आठवडी बाजारात येणाऱ्या शेतकऱ्यांचा भाजीपाल्याचा कर माफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:28 IST2021-02-12T04:28:38+5:302021-02-12T04:28:38+5:30

केदारखेडा ग्रामपंचायतीचा निर्णय : नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंच यांचा निर्णय केदारखेडा : येथील आठवडी बाजारात भाजीपाला घेऊन येणाऱ्या ...

Vegetable tax exemption for farmers coming to the weekly market | आठवडी बाजारात येणाऱ्या शेतकऱ्यांचा भाजीपाल्याचा कर माफ

आठवडी बाजारात येणाऱ्या शेतकऱ्यांचा भाजीपाल्याचा कर माफ

केदारखेडा ग्रामपंचायतीचा निर्णय : नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंच यांचा निर्णय

केदारखेडा : येथील आठवडी बाजारात भाजीपाला घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांचा कर माफ करण्याचा निर्णय केदारखेडा ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सरपंच सतीश शेळके व उपसरपंच पंडित जाधव यांनी गुरुवारी घेतला आहे. या निर्णयाचे सर्वस्तरातून स्वागत केले जात आहे.

केदारखेडा येथे गुरुवारी आठवडी बाजार भरतो. येथे स्वत:च्या शेतात पिकविलेला भाजीपाला शेतकरी येऊन येतात. परंतु, ग्रामपंचायतीकडून कर लावण्यात येत असल्याने बहुतांश शेतकरी सकाळीच व्यापाऱ्याला भाजीपाल्याची विक्री करीत होते. आधीच भाजीपाल्यातून म्हणावे तेवढे उत्पन्न मिळत नाही. त्यातच ग्रामपंचायतीकडून कर घेतला जात होता. विशेष म्हणजे, एकाच मालाचा दोन वेळा कर घेतला जात होता. याबाबत ग्रामपंचायतीकडे तक्रारी देखील करण्यात आल्या. मात्र, याकडे तत्कालीन पदाधिकारी दुर्लक्ष करीत होते. यामुळे शेतकऱ्यांना नाहक भुर्दंड सहन करावा लागत होता. अनेकवेळा तर मालाच्या रकमेपेक्षा कराची रक्कम अधिक भरण्याची नामुष्की शेतकऱ्यांवर आली होती. यामुळे शेतकऱ्यांतून तीव्र नाराजी व्यक्त केली जात होती.

ही बाब नव्याने सूत्रे हाती घेतलेल्या सरपंच व उपसरपंचांच्या कानावर घालण्यात आली. याची तत्काळ दखल घेऊन सरपंच व उपसरपंच यांनी बाजारात जाऊन शेतकऱ्यांना मालाचा कर न देण्याचे आवाहन केले. तसेच ग्रामपंचायतीने मालाचा कर माफ केल्याचे जाहीर केले. यापुढे शेतकऱ्यांना कराची मागणी केल्यास तत्काळ तक्रार करावी, असेही सांगण्यात आले. यावेळी सरपंच सतीश शेळके, उपसरपंच पंडित जाधव, गणेश तांबडे, भाऊसाहेब जाधव, बालासाहेब करतारे, विष्णू जाधव, कृष्णा जाधव, महादू जाधव यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

या विषयी सरपंच सतीश शेळके व उपसरपंच पंडित जाधव यांनी सांगितले की, शेतकऱ्यांच्या एकाच मालाचा दोनवेळा कर घेतला जात होता. शेतकरी आठवडी बाजारात बसत नसेल तर बैठक कर कशासाठी ? दिवसभर बाजारात बसणाऱ्यांकडून कर घेणे रास्त आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा कर माफ करण्यात आला आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून समाधान वाटते.

Web Title: Vegetable tax exemption for farmers coming to the weekly market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.