मुख्याधिकाऱ्यांना विविध निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:28 IST2021-02-07T04:28:25+5:302021-02-07T04:28:25+5:30
रस्त्यावर खड्डे जालना : जालना तालुक्यातील सिंधी काळेगाव रस्त्यावर खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे रस्त्यावरून चालणेही अवघड झाले आहे. ...

मुख्याधिकाऱ्यांना विविध निवेदन
रस्त्यावर खड्डे
जालना : जालना तालुक्यातील सिंधी काळेगाव रस्त्यावर खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे रस्त्यावरून चालणेही अवघड झाले आहे. खड्डे बुजविण्याची मागणी अनेकवेळा करण्यात आली. परंतु, याकडे दुर्लक्ष करण्यात आले. याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.
उपोषणास भाजपचा जाहीर पाठिंबा
अंबड : आमदार नारायण कुचे यांनी भाजपच्या प्रमुख पदाधिकारी व बुथप्रमुख कार्यकर्त्यांची अंबड येथील कार्यालयात बैठक घेऊन साष्ट पिंपळगाव येथे चालू असलेल्या मराठा आरक्षणासंबंधी राज्यव्यापी ठिय्या आंदोलनास पाठिंबा दिल्याचे जाहीर केले. यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल कोलते, दीपक ठाकूर, तालुकाध्यक्ष जितेंद्र पालकर आदी उपस्थित होते.
दैठणा येथे कृषी विभागाची शिवारफेरी
तीर्थपुरी : घनसावंगी तालुका कृषी अधिकारी राम रोडगे व गटविकास अधिकारी मनोहर जाधव यांनी दैठणा गावातील शेत शिवारात जाऊन फळपिकांबरोबरच इतर पिकांची प्रत्यक्ष पाहणी करून विविध योजनांबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला मंडळ अधिकारी साळवे, संजय लोंढे, भोसले, रेंगे, गायकवाड, तलाठी शेख, ग्रामसेवक तौर आदी उपस्थित होते.
राजेश राठोड यांची सदस्यपदी निवड
मंठा : आमदार राजेश राठोड यांची महाराष्ट्र राज्य उच्च शिक्षण व विकास आयोगाच्या सदस्यपदी निवड झाली आहे. आ. राठोड यांनी महाराष्ट्र राज्यात आणि इतर राज्यांमध्ये काँग्रेस पक्ष बळकटीसाठी प्रयत्न केले. नुकतीच त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभेवर नियुक्त करण्यात आले आहे. आता त्यांची शिक्षण व विकास आयोगावर निवड झाली.
जालन्यात एकदिवसीय कार्यशाळा
जालना : भारतीय जैन संघटना, व्यापारी महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने आहार ते आरोग्य ओजस जीवनशैली प्रणालीचे विशेषज्ञ मुंबई येथील अतुल शाह यांची आरोग्यविषयी एकदिवसीय कार्यशाळा रविवारी जैन भवन, सकलेचानगर येथे आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेस नागरिकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
राजकुमार दांडगे यांचा सत्कार
जालना : येथील राजकुमार दांडगे यांचा सत्कार मिटकॉन उद्योजकता विकास प्रशिक्षण विभागाचे जिल्हा प्रकल्प अधिकारी के.डी. दांडगे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी सिव्हिल इंजिनीअर सुदर्शन शेंडे, प्रथमेश दांडगे यांच्यासह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
वालसावंगीतील शिक्षकांचे आंदोलन
भोकरदन : भोकरदन तालुक्यातील वालसावंगी येथील बालाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील अनुदानित शिक्षक विविध मागण्यांसाठी मुंबई येथील आंदोलनात सहभागी झाले आहेत. विविध मागण्यांसाठी हे आंदोलन केले जात आहे. या आंदोलनात वालसावंगी येथील कैलास फुसे, संभाजी राऊत, विशाल गुजर, धनंजय साबळे, भारत घुनावत, परदेशी, खडके आदी सहभागी झाले असल्याची माहिती देण्यात आली आहे.
प्रतिष्ठान संयोजन समिती अध्यक्षपदी बारहाते
अंबड : तालुक्यातील शेवगा येथील जिजाऊ प्रतिष्ठानच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त यावर्षी विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येणार आहेत. जिजाऊ प्रतिष्ठानच्या संयोजन समितीच्या अध्यक्षपदी भाऊसाहेब बारहाते, तर सचिवपदी दत्ता नागरे, उपाध्यक्ष पाराजी शेरे, कोषाध्यक्ष संकेत खरात, सहसचिव इसाक पठाण, सल्लागार ॲड. श्याम तिकांडे आदींची निवड करण्यात आली आहे. या निवडीचे सर्वस्तरांतून कौतुक होत आहे.