वचक संपला...जालन्यात मुंबई-कल्याण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:38 IST2021-02-25T04:38:30+5:302021-02-25T04:38:30+5:30
गेल्या वर्षभरापासून जालना शहर चांगलेच चर्चेत आले आहे. याचा परिणाम हा सर्वसामान्य माणसांवर प्रत्यक्ष - अप्रत्यक्षपणे होत आहे. शहरात ...

वचक संपला...जालन्यात मुंबई-कल्याण
गेल्या वर्षभरापासून जालना शहर चांगलेच चर्चेत आले आहे. याचा परिणाम हा सर्वसामान्य माणसांवर प्रत्यक्ष - अप्रत्यक्षपणे होत आहे. शहरात व्यापार, उद्योग मोठ्या प्रमाणावर असल्याने येथे काही मूठभर चुकीच्या नागरिकांनी आपल्या लाभासाठी वाट्टेल ते करून लाभ उचलण्याची जणूकाही सुपारीच घेतली आहे. यामुळे अनेक गट-तट पडले असून, यातूनच गोळीबार होणे, गावठी कट्टे सापडणे, चोरी, दरोड्यांचे प्रकार वाढले आहेत. यातून वर्दीचा धाक कमी झाल्याचे समोर येत आहे. पूर्वी वर्दीतील एक माणूस दिसला तरी मोठा जमाव शांत होत होता. आज तसे चित्र दुर्मीळ होताना दिसून येत आहे.
समृद्धी महामार्ग जालना शहराजवळून गेल्याने जवळपास एकट्या जालन्यात ७०० कोटी रूपयांपेक्षा अधिकचा मावेजा मिळाला आहे. त्यातून ऐन मंदीतही जिल्ह्यात सर्वत्र अर्थसंपन्न वातावरण होते. आलेल्या या पैशांची योग्य पद्धतीने गुंतवणूक करण्यासाठी जमीन खरेदीचे व्यवहार वाढले. यातूनच स्पर्धा होऊन अनेकजण या-ना त्या मार्गाने एकमेकांची उणीदुणी काढताना दिसत आहेत. कुठल्याही मुद्यावरून ब्लॅकमेल करून पैसा ओरबाडण्याचे जणूकाही शहरात पेव फुटले आहे. या व्यावसायिक स्पर्धेतून गुन्हेगारीला चालना मिळत असल्याचे दिसून येते. वाळूचा अवैध उपसा असो की, दोन दिवसांपूर्वी येथील व्यापाऱ्याच्या अपरहणाच्या मुद्यावरून जालना पुन्हा चर्चेत आले आहे.
या आधी देखील बांधकाम व्यावसायिक गौतम मुनोत यांच्यासह शहरातील प्रतिष्ठित व्यापारी सिंघवी यांच्यावर गोळीबाराच्या घटनांना उजाळा मिळाला आहे. त्या सर्व प्रकरणांमध्ये देखील पोलिसांकडून अपेक्षित असणारा सडेतोड तपास लागलेला नाही. यासह शहरातील खासगी सावकारी वाढली असून, यावर कोणी तक्रार करत नसल्याचे पोलिसांचे म्हणणे असून, जोपर्यंत तक्रार येत नाही, तोपर्यंत आम्ही काहीच करू शकत नाही, असे पोलिसांकडून सांगितले जात आहे. एकूणच बहुतांश राजकीय पक्षांकडून गुंड प्रवृत्तीना मिळणारे संरक्षण आणि पोलिसांची ढीलाई यामुळे गुन्हेगारीला एक प्रकारे प्रतिष्ठा मिळत असल्याचे चित्र सध्या जिल्हाभरात निर्माण होत आहे. हे कुठे तरी थांबवून शहरातील गुन्हेगारांचा कणा शोधून त्याचा बिमोड करण्याचे मोठे आव्हान पोलीस प्रशासन आणि राजकीय पक्षांच्या नेत्यासमोर निर्माण झाले आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये.