किनगाववाडीत लसीकरण मोहीम - पान ४
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:35 IST2021-09-07T04:35:45+5:302021-09-07T04:35:45+5:30
वालसावंगी जि.प. शाळेत चाचणी वालसावंगी : भोकरदन तालुक्यातील वालसावंगी येथील जिल्हा परिषद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांची कोरोना ...

किनगाववाडीत लसीकरण मोहीम - पान ४
वालसावंगी जि.प. शाळेत चाचणी
वालसावंगी : भोकरदन तालुक्यातील वालसावंगी येथील जिल्हा परिषद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली. आठवी ते बारावी उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली. या वेळी सुनील वानखेडे, अनिल बोराडे, विजय पाटील, सुभाष गवळी, खैरनार, सपकाळ आदींची उपस्थिती होती.
शेषराव खरात यांची अध्यक्षपदी निवड
जालना : येथील घायाळनगर भागातील लोकमान्य शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी शेषराव खरात यांची निवड करण्यात आली. तसेच संस्थेचे उपाध्यक्ष म्हणून त्र्यंबक जाधव, सचिव डॉ. प्रा. विजय राजाळे, सहसचिव गजानन भवर, कोषाध्यक्ष भाऊराव चव्हाण, संचालक साहेबराव ढवळे, त्र्यंबक मगर, तुकाराम झोरे, द्वारकानाथ वाघमारे, गणेश वाघमारे, संदीप ढवळे, निरंजन चव्हाण, पल्लवी जाधव यांची निवड करण्यात आली.
अवैध दारूविक्रेत्यांवर कारवाईची मागणी
जालना : रामनगर परिसरात अवैध दारूविक्री मोठ्या प्रमाणात होत आहे. तळीरामांमुळे भांडण-तंट्यात वाढ होत असून, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. शिवाय महिला, मुलींनाही नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याकडे संबंधितांनी लक्ष देऊन कारवाई मोहीम राबवावी, अशी मागणी होत आहे.
पावसाचे पाणी गोडाऊनमध्ये शिरले
अंबड : शहर आणि परिसरात शनिवारी रात्री पडलेल्या जोरदार पावसामुळे अनेकांची तारांबळ उडाली. महामार्गावरील नाल्याचे काम सुरू असल्याने पाणी जाण्यास अडचण येत असल्याने हे पाणी मुरून अनेकांच्या दुकान व गोडाऊनमध्ये शिरल्याने दुकानातील वस्तूंचे नुकसान झाले आहे. या नुकसानीची शासनाने भरपाई देण्याची मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे.
शहरांतर्गत रस्त्यांच्या दुरुस्तीची मागणी
अंबड : शहरांतर्गत विविध भागातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. थोडाही पाऊस झाला की खड्ड्यांमध्ये पाणी जमा होत आहे. त्यामुळे चालकांना कसरत करीत वाहने चालवावी लागत आहेत. ही बाब पाहता संबंधित विभागाने लक्ष देऊन रस्त्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.
‘त्या’ आरोपींवर कडक कारवाई करावी
मंठा : जालना उपविभागाच्या वतीने बंजारा जातीचे खोटे आणि बनावट प्रमाणपत्र देण्यात आल्याने त्याचा लाभ घेणाऱ्यांवर किंवा पदोन्नती मिळविणाऱ्यांवर कारवाई व्हावी, अशी मागणी आमदार राजेश राठोड यांनी केली आहे. जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्याशी संपर्क साधून कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. जातीचे खोटे प्रमाणपत्र काढून त्याच्या आधारे आर्थिक लाभ घेणे किंवा पदोन्नती मिळवणे ही बाब अतिशय गंभीर असून, याबाबत कडक कारवाई झाली पाहिजे. असे आमदार राठोड म्हणाले.
रस्त्यावर खड्डे
जालना : शहरातील रेल्वे स्थानक रोडवर खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे वाहनधारकांसह पादचाऱ्यांनाही त्रास होत आहे. हे रस्ते त्वरित दुरुस्त करण्याची मागणी होत आहे.