१०५ कोरोना योद्ध्यांवर बेरोजगारीची वेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:02 IST2021-02-05T08:02:49+5:302021-02-05T08:02:49+5:30
जालना : कोरोना काळात कोविड रुग्णालयातील कामकाजासाठी कंत्राटी तत्त्वावर घेण्यात आलेल्या १०५ कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात आले आहे. कोरोनाचा ...

१०५ कोरोना योद्ध्यांवर बेरोजगारीची वेळ
जालना : कोरोना काळात कोविड रुग्णालयातील कामकाजासाठी कंत्राटी तत्त्वावर घेण्यात आलेल्या १०५ कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात आले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव संपलेला नसताना कामावरून कमी करण्यात आल्याने संबंधितांवर उपासमारीची वेळ आली असून, नोकरीत कायम ठेवावे, या मागणीसाठी संबंधित कर्मचाऱ्यांनी आता उपोषणाचा इशारा दिला आहे.
कोरोनाचा फैलाव झाला आणि जग ठप्प झाले. एखाद्याला कोरोनाची बाधा झाली तर त्याचे नातेवाईकही त्याच्यापासून दूर गेले. परंतु, कोरोना योद्ध्यांनी या बाधितांची सेवा केली. कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी मनुष्यबळ कमी पडू लागल्याने शासनाच्या वतीने जिल्ह्यात कंत्राटी तत्त्वावर १०५ जणांची नियुक्ती करण्यात आली होती. कोविड रुग्णालयात सेवा देणाऱ्या कायम आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांनी बाधित रुग्ण लवकरात लवकर बरे व्हावेत, यासाठी काम केले. सध्या कमी झालेले कोरोना रुग्ण आणि संपलेला कराराचा कालावधी हे कारण देत प्रशासनाने कंत्राटी कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले आहे.
प्रशासनाने कामावरून कमी केल्याचे अचानक समजताच या कंत्राटी अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही मोठा धक्का बसला आहे. कोरोनाच्या काळात कुटुंबाची काळजी न करता कोरोना बाधितांची सेवा केली. परंतु, कामावरून कमी केल्याने संबंधितांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे प्रतीक्षा यादी रद्द करून जिल्ह्यातील रिक्त पदांवर कंत्राटी स्वरूपात नियुक्ती द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
म्हणे, गरज पडली तर बोलावू
कोरोनाच्या काळात जिवावी पर्वा न करता या कंत्राटी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कोरोना बाधितांची सेवा केली. प्रसंगी अनेकजणांना कोरोनाची बाधा झाली तर अनेकजण क्वारंटाईन झाले. सध्याही कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. परंतु, शासनाने या कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले आहे. गरज पडली तर पुन्हा कामावर बोलावू, अशी भूमिका घेत प्रतीक्षा यादी प्रसिध्द करण्यात आली आहे.
कोट
...तर आंदोलन करू
आम्ही कोरोनाच्या काळात आमच्या जिवाची, कुटुंबातील सदस्यांची काळजी न करता बाधितांची सेवा करून त्यांना कोरोनामुक्त करण्यासाठी प्रयत्न केले. परंतु, शासन निर्णयामुळे आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. शासनाने आम्हाला रिक्तपदांवर नियुक्ती देऊन सेवेत घ्यावे. मागणी मान्य न झाल्यास आंदोलन केले जाईल.
शरद चव्हाण
कंत्राटी कर्मचारी
कोट
शासन निर्देशानुसार कंत्राटी कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त झाली आहे. शासनस्तरावरून जो आदेश येईल, त्यानुसार प्रशासकीय पातळीवर निर्णय घेतला जाईल.
अर्चना भोसले
जिल्हा शल्यचिकित्सक, जालना