लॉकडाऊनमुळे नोकरी गेली, गावाकडे हाताला काम नसल्याने बेरोजगार युवकाने संपवले जीवन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 17:04 IST2020-12-22T16:57:57+5:302020-12-22T17:04:07+5:30
Unemployed youth commits suicide in Jalana लॉकडाऊनमध्ये नोकरी गेली, गावाकडे काम नसल्याने बेरोजगार युवकाची आत्महत्या

लॉकडाऊनमुळे नोकरी गेली, गावाकडे हाताला काम नसल्याने बेरोजगार युवकाने संपवले जीवन
भोकरदन (जालना) : कंपनीतील गेलेली नोकरी, गावात हाताला न मिळणारे काम आणि घरातील अडचणी सोडविण्याचा प्रश्न यामुळे चिंतित झालेल्या एका २२ वर्षीय बेराेजगार युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही दुर्दैवी घटना सुरंगळी (ता. भोकरदन जि. जालना) येथे मंगळवारी सकाळी समोर आली.
समाधान साळुबा फोलाने (२२) असे मयत युवकाचे नाव आहे. सुरंगळी येथील समाधान फोलाने याचे बारावीपर्यंत शिक्षण झाले आहे. समाधान फोलाने याच्या वडिलांचे चार वर्षांपूर्वी निधन झाले आहे. घरातील परिस्थिती जेमतेम. त्यात दीड एकर शेतीतूनही उत्पन्न मिळत नव्हते आणि घरातील प्रश्नही सुटत नव्हते. त्यामुळे समाधान फोलाने हा तीन वर्षांपूर्वी औरंगाबाद येथील कंपनीत कामाला गेला होता. तेथे काम करून येणाऱ्या पगारातून सुरंगळी येथील कुटुंबाला मदत करीत होता. मात्र, कोरोनामुळे लॉकडाऊन लागू झाले आणि समाधानची नोकरी गेली. गावात आल्यानंतर काही दिवस शेतात तर काही दिवस इतर ठिकाणी जाऊन तो काम करीत होता. मात्र, गत काही दिवसांपासून त्याच्या हाताला काम नव्हते. कंपनीतही नोकरी मिळेल की नाही ? याची चिंता त्याला होती. त्यामुळे समाधान चिंतित होता. याच चिंतेतून समाधानने सोमवारी रात्रीच्या सुमारास राहत्या घरातील एका खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली.
मंगळवारी सकाळी तो उठला नसल्याने नातेवाईकांनी त्याला आवाज देऊन उठविण्याचा प्रयत्न केला. मात्र, खोलीतून प्रतिसाद मिळत नसल्याने नातेवाईकांनी आतमध्ये पाहिले असता त्याने गळफास घेतल्याचे समोर आले. पंचनाम्यानंतर भोकरदन येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्याच्या पश्चात आई, दोन भाऊ असा परिवार आहे. या प्रकरणी भोकरदन पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, तपास पोलीस नाईक एन.एस. जाधव हे करीत आहेत.
नातेवाईकांचा आक्रोश
घरातील समस्या सोडविण्यासाठी समाधान औरंगाबादेतील कंपनीत काम करीत होता. कोरोनामुळे तो गावात येऊन राहू लागला. मात्र, हाताला काम नसल्याने त्याने आत्महत्या केल्याचे समजताच कुटुंबातील सदस्यांसह नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. त्याच्या निधनाने गावावर शोककळा पसरली आहे.