अनधिकृत नळधारक पालिकेच्या रडारवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:55 IST2021-02-06T04:55:34+5:302021-02-06T04:55:34+5:30
१७ कोटींची थकबाकी : अनधिकृत नळधारकांवर कारवाईची गरज विजय मुंडे जालना : उद्योगनगरी असलेल्या जालना शहरातील घरांची संख्या जवळपास ...

अनधिकृत नळधारक पालिकेच्या रडारवर
१७ कोटींची थकबाकी : अनधिकृत नळधारकांवर कारवाईची गरज
विजय मुंडे
जालना : उद्योगनगरी असलेल्या जालना शहरातील घरांची संख्या जवळपास ६० हजार असून, व्यावसायिक दुकानांची संख्या दोन हजाराच्या आसपास आहे. शहरात एकूण ६२ हजार मालमत्ताधारक असताना केवळ २१ हजार अधिकृत नळकनेक्शन आहेत. विशेषत: अनधिकृत नळकनेक्शन घेऊन पाण्याचा वापर करणाऱ्यांची संख्या शहरात वाढली असून, अनधिकृत नळधारकांमुळे नगर पालिकेच्या तिजोरीवर मोठा आर्थिक भार पडत आहे.
उद्योगनगरी असलेल्या जालना शहराची लोकसंख्या जवळपास साडेतीन लाख आहे, तर शहरात दैनंदिन असणारी तरंगती लोकसंख्या ३० ते ४० हजाराहून अधिक आहे. या लोकसंख्येला दैनंदिन पाण्याचा पुरवठा करण्यासाठी जवळपास ४८ एमएलडी पाण्याची गरज आहे. शहराला जायकवाडी पाणीपुरवठा योजनेतून व घाणेवाडी योजनेद्वारे पाण्याचा पुरवठा केला जात आहे. शहरातील घरांची संख्या जवळपास ६० हजार, तर व्यावसायिक दुकानांची संख्या २ हजाराच्या आसपास आहे. एकूण मालमत्ता धारकांची संख्या ६२ हजाराच्या वर असताना शहरातील अधिकृत नळधारकांची संख्या २१ हजाराच्या आसपास आहे. या नळधारकांकडेही तब्बल १७ कोटी ७८ लाख ५५ हजर रुपयांची थकबाकी आहे.
शहराची लोकसंख्या, दैनंदिन होणारा पाणीउपसा, ठिकठिकाणचे लिकेज आणि अनधिकृत नळधारक यामुळे पाणी वितरणावर मोठा परिणाम होत आहे. या समस्यांवर मात करून नगर पालिकेकडून चार ते पाच दिवसाआड पाण्याचा पुरवठा केला जातो. परंतु, वीजबिल, लिकेज, पाईपलाईन दुरूस्तीसह इतर कामांवर मोठ्या प्रमाणात खर्च होत आहे. होणारा खर्च आणि अनधिकृतरित्या उपसल्या जाणाऱ्या पाण्याचा बुडणारा कर यातही मोठा फरक आहे. अनेकजण कर चुकवून पाण्याचा वापर करीत आहेत. परिणामी पालिकेच्या तिजोरीवरही याचा भार पडत असून, शहरातील पाणीवितरणही विस्कळीत होत आहे. त्यामुळे अनधिकृत नळधारकांचा शोध घेऊन नगर पालिकेने कारवाई मोहीम राबविणे गरजेचे आहे.
७६ लाखांची वसुली
नगर पालिकेच्या पथकाकडून गत काही दिवसांपासून पाणीपट्टी कराची वसुली सुरू करण्यात आली आहे. थकीत करापैकी केवळ ७६ लाख रुपयांचा कर वसूल करण्यात आला आहे. कराच्या वसुलीसाठी नगर पालिकेची सहा पथके कार्यरत आहेत.
आठ कनेक्शन केले कट
जालना शहरातील सराफा लाईन परिसरात अनधिकृत नळकनेक्शनधारक असल्याची तक्रार मुख्याधिकारी नार्वेकर यांच्याकडे प्राप्त झाली होती. त्यानुसार नगर पालिकेच्या पथकाने कारवाई करून या भागातील आठ कनेक्शन कट केली आहेत.
तीन टाक्यांचे काम पूर्ण
शहराची पाण्याची गरज पाहून पाणीसाठा करण्यासाठी नवीन आठ टाक्यांचे काम सुरू आहे. त्यातील तीन टाक्यांचे काम पूर्ण झाले असून, उर्वरित टाक्यांचे काम अंतिम टप्प्यात आहे. या कामाला पालिकेने मे पर्यंत मुदतवाढ दिली आहे. या टाक्यांचे काम पूर्ण झाल्यानंतर गरजेनुसार पाण्याचा उपसा करता येणार आहे.
कोट
शहरातील पाणीवितरण व्यवस्था सुरळीत करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. कर वसुलीसाठीही प्रयत्न सुरू असून, त्यासाठी आठ पथके नियुक्त करण्यात आली आहेत. शिवाय शहरातील अनधिकृत नळधारकांचा शोध घेऊन त्यांच्याविरोधातही कारवाईची मोहीम लवकरच हाती घेतली जाणार आहे.
नितीन नार्वेकर
मुख्याधिकारी, नगर परिषद, जालना
कोट
शहराला सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. पाणीवितरणात पाईपलाईन फुटणे असो किंवा इतर निर्माण होणाऱ्या अडचणी असोत, यावर आम्ही तत्काळ मात करून सुरळीत पाणी पुरवठा करतो. नागरिकांनीही अधिकृत नळकनेक्शन घेऊन नगर पालिकेला कराचा भरणा करणे गरजेचे आहे.
पुनम राज स्वामी
सभापती, पाणीपुरवठा
शहराची लोकसंख्या ३.५० लाख
दैनंदिन पाण्याची गरज ४८ एमएलडी
दैनंदिन मिळणारे पाणी २८ एमएलडी
अधिकृत नळधारक २१ हजार