वडीगोद्री (जि. जालना) : रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या दोघांना भरधाव जीपने जोराची धडक दिली. या अपघातात कुशल दिलीप सोनवणे (१६, रा. खडका, ता. घनसावंगी) या मुलाचा मृत्यू झाला, तर त्याचा मामा राज दिलीप शिंदे (रा. गोरेगाव, मुंबई) हा गंभीर जखमी झाला. ही घटना मंगळवारी (दि. १३) रात्री ११:३० वाजेच्या सुमारास सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील दोदडगाव फाट्यावर घडली.
कुशल सोनवणे हा आपल्या परिवारासह मावशीच्या लग्नासाठी दोदडगाव (ता. अंबड) येथे आला होता. मंगळवारी हळदीचा कार्यक्रम संपल्यानंतर कुशल हा आपले वडील व मामासोबत पाणी बॉटल आणण्यासाठी दुचाकीवरून (क्र. एमएच २१ एडब्ल्यू १२२०) धुळे - सोलापूर महामार्गावर आला होता. महामार्गावर रस्त्याच्या कडेला दुचाकी उभी करून वडील पाणी बॉटल आणण्यासाठी हॉटेलकडे गेले. दरम्यान, राज शिंदे व कुशल सोनवणे हे दोघे रस्त्याच्या कडेला दुचाकीजवळ उभे होते. त्यावेळी छत्रपती संभाजीनगरकडून बीडकडे भरधाव जाणाऱ्या जीपने (क्र. एमएच ४४ झेड ७२७२) त्या दोघांना जोराची धडक दिली. यात कुशलचा जागीच मृत्यू झाला, तर राज शिंदे हा गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले. अपघातानंतर जीपचालक फरार झाला. घटनेची माहिती मिळताच गोंदी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. जीपचालकाविरोधात गोंदी ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
दोन दिवसांत तिघांचा मृत्यूधुळे-सोलापूर महामार्गावर बारसवाडा फाट्यावर रविवारी रात्री हायवा व कार अपघातात दोघांचा मृत्यू झाला होता, तर पाचजण जखमी झाले होते. या घटनेच्या तिसऱ्याच दिवशी मंगळवारी त्या ठिकाणाहून काही अंतरावर असलेल्या दोदडगाव फाट्यावर पुन्हा अपघात झाला असून, या अपघातात एक ठार, एकजण गंभीर जखमी झाला आहे. अतिवेगामुळे महामार्गावरील अपघातात वाढ होत आहे.