देशातून दोन लाख यात्रेकरू हजला जाणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2019 00:06 IST2019-06-17T00:05:51+5:302019-06-17T00:06:23+5:30
यंदा देशातून जवळपास दोन लाखांपेक्षा अधिक यात्रेकरू हे हजला जाणार असल्याची माहिती जमाल सिद्दीकी यांनी दिली.

देशातून दोन लाख यात्रेकरू हजला जाणार
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : केंद्रातील पंतप्रधान मोदी सरकारने हज यात्रेकरूंसाठी सवलत दिली जात होती, या सवलतीचा फायदा विमान कंपन्यांनाच होत होता. हे लक्षात आल्यामुळे ही सवलत रद्द केली आहे. असे असले तरी हजला जाणाऱ्या यात्रेकरूंसाठीच्या तिकिटावरील जीएसटी कमी केला आहे. यंदा देशातून जवळपास दोन लाखांपेक्षा अधिक यात्रेकरू हे हजला जाणार असल्याची माहिती हज समितीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांनी रविवारी आयोजित प्रशिक्षण शिबिरात दिली.
हे प्रशिक्षण शिबीर डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात पार पडले. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष रामेश्वर भांदरगे, शहराध्यक्ष सिध्दिविनायक मुळे, अतिक खान, एजाज देशमुख, मसूद कुरैशी, शकील खान अहमद चाऊस आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी सिध्दिकी म्हणाले की, हज यात्रेकरूंसाठी हज समितीकडून वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देते. यावर्षी देशातून दोन लाख तर महाराष्ट्रातून चौदा हजार यात्रेकरू हजला जाणार आहेत. जालना जिल्ह्यातूनही जवळपास ३०० पेक्षा अधिक भाविक हजला जाणार आहेत.
हज यात्रेकरूसांठी जालना ते औरंगाबाद अशी स्वतंत्र बससेवा सरू करण्याचा मनोदयही त्यांनी व्यक्त केला. मक्का येथे महाराष्ट्रातील यात्रेकरूंसाठी राहण्याची चांगली सुविधा व्हावी म्हणून महाराष्ट्र हाऊस बांधणार असल्याचेही सिध्दिकी म्हणाले. या प्रशिक्षणास हज यात्रेला जाणा-या भाविकांची मोठी उपस्थिती होती.