बेकरीचे गोडावून फोडणारे दोघे अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:20 IST2021-01-13T05:20:36+5:302021-01-13T05:20:36+5:30
फोटो क्रमांक- ११ जेएनपीएच ०१ चंदनझिरा पोलिसांची कारवाई; १ लाख १२ हजारांचा मुद्देमाल जप्त लोकमत न्यूज नेटवर्क जालना : ...

बेकरीचे गोडावून फोडणारे दोघे अटकेत
फोटो क्रमांक- ११ जेएनपीएच ०१
चंदनझिरा पोलिसांची कारवाई; १ लाख १२ हजारांचा मुद्देमाल जप्त
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : शहरातील एमआयडीसी परिसरातील बेकरीचे गोडावून फोडून चोरी करणाऱ्यासह हा चोरीचा माल विकत घेणाऱ्याला चंदनझिरा पोलिसांनी रविवारी ताब्यात घेतले. शेख फेरोज शेख निजाम (४०, रा. चंदनझिरा), सगीर नासेर कुरेशी (२६, रा. मंगळबाजार) अशी संशयित आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून १ लाख १२ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
शहरातील एमआयडीसी येथील बेकरी मालक अभय अग्रवाल यांच्या गोडावूनमधून बेकरीचे साहित्य व स्क्रॅपचा माल चोरीला गेला होता. याप्रकरणी अग्रवाल यांच्या फिर्यादीवरून ३ जानेवारी रोजी चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, बेकरीमध्ये चोरी करण्यासाठी वापरण्यात आलेली ऑटोरिक्षा ही चंदनझिरा येथे लावलेली आहे, अशी माहिती पोलिसांना मिळाली.
पोलिसांनी त्याठिकाणी जाऊन ऑटोरिक्षामध्ये बसलेला संशयित आरोपी शेख फेरोज शेख निजाम याला ताब्यात घेऊन विचारपूस केली. त्याने काही दिवसांपूर्वीच बेकरीचे गोडावून फोडल्याची कबुली दिली. तसेच चोरीचे साहित्य औरंगाबाद चौफुली येथील एका स्क्रॅपच्या दुकानात विकल्याचे सांगितले. पोलिसांनी स्क्रॅप दुकानातून चोरी केलेला फॅन व भंगार जप्त केले. तसेच चोरीचा माल खरेदी करणारा दुकानदार सगीर नासेर कुरेशी यालाही ताब्यात घेतले. त्याच्याकडून ऑटोरिक्षासह १ लाख १२ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक विनायक देशमुख, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख, उपविभागीय अधिकारी सुधीर खिरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्यामसुंदर कौठाळे, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद बोंडले, शिवाजी पोहार, पोलीस कर्मचारी अनिल चव्हाण, रवी देशमुख व अनिल काळे यांनी केली.
आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी
शेख फेरोज शेख निजाम (४०, रा. चंदनझिरा), सगीर नासेर कुरेशी (२६, रा. मंगळबाजार) या संशयितांना सोमवारी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास शिवाजी पोहार करत आहेत.