एकास मारहाण करून लुटणारे दोघे जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:28 IST2020-12-22T04:28:56+5:302020-12-22T04:28:56+5:30
फोटो जालना : शेळ्या चारणाऱ्या व्यक्तीला मारहाण करून लुटणाऱ्या दोघांना चंदनझिरा पोलिसांनी जेरबंद केले. ही कारवाई शनिवारी रात्री करण्यात ...

एकास मारहाण करून लुटणारे दोघे जेरबंद
फोटो
जालना : शेळ्या चारणाऱ्या व्यक्तीला मारहाण करून लुटणाऱ्या दोघांना चंदनझिरा पोलिसांनी जेरबंद केले. ही कारवाई शनिवारी रात्री करण्यात आली. दोघांकडून चोरीस गेलेला अर्ध्या लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
तालुक्यातील दरेगाव येथील संभाजी कोरडे हे ११ डिसेंबर रोजी सकाळी एमआयडीसी भागातील जंगलात शेळ्या चारत होते. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोघांनी घाणेवाडीचा रस्ता विचारला. त्यानंतर अचानक कोरडे यांना खाली पाडून मारहाण करीत त्यांचे हातपाय दोरीने बांधले. त्यानंतर त्यांच्याकडील सहा ग्रॅमची सोन्याची अंगठी, कानातील तीन ग्रॅमच्या दोन बाळ्या, एक मोबाईल घेऊन पोबारा केला. या प्रकरणी कोरडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या चोरी प्रकरणातील आरोपींची माहिती चंदनझिरा पोलीस ठाण्यातील विशेष पथकातील कर्मचारी अनिल काळे यांना मिळाली होती. त्यानुसार या पथकाने पोलीस निरीक्षक शामसुंदर कौठाळे यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी सायंकाळी गणेश कांबळे (रा. हनुमान घाट, जालना) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर त्याने ती लूटमार आकाश देवकर (रा. लालबाग, जालना) याच्यासमवेत केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यालाही ताब्यात घेतले. चौकशीनंतर त्या दोघांनी लुटमारीतील सोन्याची रिंग, बाळी व एक दुचाकी असा ५२ हजार ६०० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक विनायक देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शामसुंदर कौठाळे, फौजदार प्रमोद बोंडले, सहाय्यक फौजदार घोडे, कर्मचारी अनिल चव्हाण, साई पवार, अनिल काळे यांच्या पथकाने केली.
गिऱ्हाईकाचा शोध होता सुरू
चोरीतील अंगठी व बाळ्या विक्री करण्यासाठी गणेश कांबळे हा लालबाग परिसरात गिऱ्हाईक शोधत होता. तो गिऱ्हाईक शोधत असल्याची माहिती मिळाल्यानंतर फौजदार प्रमोद बोंडे, अनिल काळे यांनी सापळा रचून कांबळे याला ताब्यात घेतले.
दोन दिवसांची कोठडी
अटकेतील दोघांना रविवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यांना सोमवारपर्यंत पोलीस कोठडी मिळाली होती. त्यानंतर सोमवारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्या दोघांना वाढीव दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.