वीज समस्यांबाबत ऊर्जामंत्र्यांना निवेदन
जालना : जालना तालुक्यातील शेतकऱ्यांना विजेच्या योजनेचा फायदा व्यवस्थित मिळतो की नाही, याची चौकशी करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी मनसेच्यावतीने ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याकडे करण्यात आली आहे. चौकशी न केल्यास मनसेच्यावतीने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. निवेदन देताना मनसे जिल्हाध्यक्ष गजानन गीते, तालुकाध्यक्ष कृष्णा खलसे, श्रीकांत राठोड, राम कातकडे, विलास घाटे यांच्यासह मनसेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आदी उपस्थित होते.
दोनशे कामगारांना सेफ्टी किटचे वाटप
तीर्थपुरी : घनसावंगी तालुक्यातील कंडारी व अंबड येथे दोनशे बांधकाम मजुरांना राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब जाधव यांच्या हस्ते सेफ्टी किटचे वाटप करण्यात आले. सेफ्टी किटमध्ये लोखंडी पेटी, हेल्मेट, बूट, जॅकेट, मच्छरदाणी, झुला, हॅन्डग्लोज, बॅटरी, बॅग आदी साहित्याचा समावेश आहे. यावेळी कैलास उढाण, दत्तात्रय उढाण, किरण उढाण, कालिदास उढाण, संतोष जाधव, मधुकर उढाण, अण्णा उढाण, अंकुश मोताळे, सतीश उढाण, महादेव मोताळे, गौतम उढाण, निखिल पारवे, सुनील पारवे, रामजी लांडे सतीश उढाण, विलास कचरे आदींची उपस्थिती होती.
जांबसमर्थ येथे महाआरती
जालना : युवासेनेतर्फे घनसावंगी तालुक्यातील श्रीक्षेत्र जांबसमर्थ येथे विनायक चोथे यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. यावेळी सरपंच बाबासाहेब तांगडे, सिनेअभिनेते राजकुमार तांगडे, पंचायत समिती सदस्य सुशील तांगडे, माजी सरपंच राजेंद्र तांगडे, माजी उपसरपंच अमोल आधुडे, युवासेना तालुका समन्वयक गोपाल तांगडे, रामराव तांगडे, शेख मुस्ताफ, सोपान राक्षे, विष्णू वायदळ, संभाजी तांगडे, श्याम तांगडे, नामदेव देवकर, गोपाल तांगडे, पवन तांगडे, पांडुरंग तांगडे, भाऊसाहेब देवकर, सुशील तांगडे आदी उपस्थित होते.
ख्रिस्ती समाजाचे विविध प्रश्न प्रलंबित
जालना : ख्रिस्ती समाज आपल्या विविध प्रश्नांसंदर्भात शासनाकडे गेल्या वीस वर्षांपासून महाराष्ट्र अल्पसंख्याक ख्रिस्ती विकास परिषद व अन्य संघटनांच्या माध्यमातून पाठपुरावा करत आहे. समाजाला कायम गृहीत धरले जाते, ही समाज भावना आहे. या प्रश्न आणि भावनेच्या निराकरणासाठी ठोस नियोजन ही गरज असल्याचे महाराष्ट्र अल्पसंख्याक ख्रिस्ती विकास परिषदेचे अध्यक्ष अनिल भोसले यांनी म्हटले आहे. देशातील विविध ख्रिस्ती संघटनांच्या माध्यमातून समाजाचे प्रश्न सोडवणुकीसाठी प्रयत्न होत आहेत. परंतु पाहिजे तशी गती येत नाही. समाजातील महिलांचे प्रश्न, तरुणांची वाढती बेरोजगारी, उच्च शिक्षण घेण्याची इच्छा असूनही आर्थिक परिस्थितीमुळे अनेक होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना वंचित राहावे लागत असल्याचे म्हटले आहे.
केंद्रस्तरीय शाळापूर्व तयारी आढावा
पारध : केंद्रांतर्गत जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षकांची केंद्रस्तरीय शाळापूर्व आढावा सहविचार बैठक केंद्रप्रमुख एम. बी. लोखंडे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. बैठकीत शिक्षणाधिकारी, गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी यांनी दिलेल्या सूचनांवर चर्चा करण्यात आली. सुंदर माझे कार्यालय सुंदर माझी शाळा उपक्रमाअंतर्गत प्रत्येक शाळेचा आढावा घेण्यात आला. पाठ्यपुस्तक, प्रवेश पंधरवडा, आधार अपडेशन, यू डायस, शाळा सिद्धी, विद्यार्थी प्रमोशन आदी बाबींचा आढावा घेण्यात आला.
ठिकठिकाणी कचरा
अंबड : शहरात ठिकठिकाणी कचरा साचला आहे. त्यामुळे दुर्गंधी पसरत असून, याचा नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. पालिकेने हा कचरा उचलावा, अशी मागणी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अफरोज पठाण यांनी केली आहे.
कारवाईची मागणी
जाफराबाद : शहरासह ग्रामीण भागात अवैधरित्या दारूविक्री केली जात आहे. तळीरामांमुळे महिला, मुलींना नाहक त्रास सहन करावा लागत असून, कायदा - सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. ही बाब पाहता संबंधित विभागाने कारवाई मोहीम राबवावी, अशी मागणी होत आहे.
दिवसाही पथदिवे सुरूच
जालना : शहरांतर्गत भागातील पथदिव्यांना ॲटो ऑन ऑफ स्वीच बसविण्यात आलेले नाहीत. त्यामुळे बहुतांश भागातील पथदिवे हे दिवसाही सुरूच राहात आहेत, तर काही भागात पथदिवेच नसल्याने रात्रीच्या वेळी नागरिकांची गैरसोय होत आहे.
रुग्णसंख्येत वाढ
भोकरदन : गत काही दिवसांपासून वातावरणात सतत बदल होत आहे. बदलत्या वातावरणामुळे रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे. सर्दी, खोकला, तापाचे रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे रुग्णालय परिसरात गर्दी वाढत आहे. अनेकांनी घरगुती उपचारांवर भर दिला आहे.
हिसोड्यात नाल्या तुंबल्या
हिसोडा : भोकरदन तालुक्यातील हिसोडा येथील गावांतर्गत भागातील नाल्या ठिकठिकाणी तुंबल्या आहेत. त्यामुळे दुर्गंधी पसरत असून, ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ग्रामपंचायतीने स्वच्छता मोहीम राबवावी, अशी मागणी होत आहे.