ट्रॅव्हल्सचे चाक पुन्हा पंक्चर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:28 IST2021-03-21T04:28:25+5:302021-03-21T04:28:25+5:30
जालना : जिल्ह्यात कोरोनाच्या वाढत्या संख्येमुळे एसटी महामंडळासोबतच खासगी ट्रॅव्हल्सलाही मोठा फटका बसला आहे. यामध्ये डिझेलचा खर्च आणि कर्मचाऱ्यांचे ...

ट्रॅव्हल्सचे चाक पुन्हा पंक्चर!
जालना : जिल्ह्यात कोरोनाच्या वाढत्या संख्येमुळे एसटी महामंडळासोबतच खासगी ट्रॅव्हल्सलाही मोठा फटका बसला आहे. यामध्ये डिझेलचा खर्च आणि कर्मचाऱ्यांचे वेतन निघणे अवघड झाले आहे.
कोरोनामुळे गेल्या वर्षभरापासून हा व्यवसाय आर्थिक अडचणीत सापडला आहे. मध्यंतरी कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने व्यवसायाला गती आली होती. परंतु, आज जिल्ह्यात गेल्या २० दिवसांमध्ये सरासरी ४०० पेक्षा अधिक कोरोना रुग्ण आढळत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी अनेक बंधने घातली आहेत. याचा मोठा फटका आमच्या व्यवसायाला बसल्याची प्रतिक्रिया ट्रॅव्हल्स चालकांनी व्यक्त केली.
सोबतच डिझेलचे दर मोठ्या प्रमाणावर वाढल्याने तो खर्चही वाढला आहे. जालना जिल्ह्यात विशेष करून जालना शहरात एकूण नऊ ट्रॅव्हल्स कंपन्या बस चालवितात. दररोज साधारणपणे ६० ते ७० बसेस या मुंबई ते नागपूर, जालना ते पुणे, जालना ते मुंबई, जालना ते नाशिक, जालना ते नागपूर अशा धावतात. परंतु, कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने या बसच्या फेऱ्या ५० टक्क्यांपेक्षा कमी झाल्या आहेत. यामुळे ट्रॅव्हल्स चालकांसमोर मोठा पेच आहे.
गाडी रुळावर येत होती पण...
जालना जिल्ह्यात डिसेंबर ते फेब्रुवारी दरम्यान कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात होती. परंतु, मार्च लागताच गेल्या वर्षीप्रमाणे रुग्णसंख्या झपाट्याने वाढली आहे. याचा परिणाम ट्रॅव्हल्सवर झाला आहे. मध्यंतरी बऱ्यापैकी प्रवासी आकर्षित झाले होते. ती संख्या आता घटली आहे.
मध्यंतरी रुळावर आलेली ट्रॅव्हल्सची गाडी पुन्हा पंक्चर झाली आहे. त्यामुळे हा व्यवसाय आता तोट्यात गेला आहे. प्रवाशांची काळजी घेताना आम्ही बस पूर्णपणे सॅनिटाईज करतो. तसेच प्रत्येकाला मास्क बंधनकारक केलेला आहे. हे सर्व नियम पाळत असलो तरी प्रवासी पूर्वीप्रमाणे आकर्षित होत नाहीत. त्यामुळे आर्थिक अडचणीत भर पडली आहे.
-गणेश घुगे, व्यवस्थापक
गेल्या वर्ष दोन वर्षांमध्ये हरिव्दार, रामेश्वरम् या चारही धामला जाणाऱ्या भाविकांची संख्या लक्षणीय होती. ती आता कोरोनामुळे मंदावल्याने ट्रॅव्हल्सच्या बस उभ्या आहेत. त्यांची निगा राखतानाच आमच्या नाकीनऊ येत असून तो एक प्रकारचा पांढरा हत्ती पोसण्यासारखे झाले आहे. ही परिस्थिती केव्हा निवळेल याची आम्ही चातक पक्ष्याप्रमाणे वाट पाहत आहोत.
-कल्याण आचार्य, संचालक
जालना शहरातील सर्व ट्रॅव्हल्स कंपन्या अडचणीत सापडल्या आहेत. त्यांना दिलासा देण्यासाठी अन्य उद्योग, व्यवसायांप्रमाणेच शासनाने थोडीबहुत नुकसान भरपाई देऊन आम्हाला संकटाच्या काळात मदत करावी, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे तसा पाठपुरावा देखील करणार आहोत.
-राजेश राऊत, अध्यक्ष ट्रॅव्हल्स असोसिएशन