ग्रामपंचायत निवडणुकीसाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:30 IST2021-01-03T04:30:47+5:302021-01-03T04:30:47+5:30
मंठा : तालुक्यातील होऊ घातलेल्या ५० ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसंदर्भात शुक्रवारी तहसील कार्यालयात निवडणूक प्राधिकृत अधिकारी तथा मंठ्याच्या तहसीलदार सुमन मोरे ...

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण
मंठा : तालुक्यातील होऊ घातलेल्या ५० ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसंदर्भात शुक्रवारी तहसील कार्यालयात निवडणूक प्राधिकृत अधिकारी तथा मंठ्याच्या तहसीलदार सुमन मोरे यांनी निवडणुकीबाबत पहिले प्रशिक्षण दिले. यावेळी मतदान केंद्रातील मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी १, २, ३ व त्यांच्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
५० ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी १० झोन क्षेत्रीय अधिकारी आणि १५ निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ५० ग्रामपंचायतींच्या निवडणुकीतून एकूण ४१८ उमेदवार निवडले जाणार असून, यासाठी एकूण १५६ प्रभाग निश्चित करण्यात आले आहेत. या निवडणुकीसंदर्भात एकूण तीन टप्प्यांत संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. दुसरे प्रशिक्षण ७ जानेवारी, तर तिसरे प्रशिक्षण १४ जानेवारी रोजी होणार आहे, अशी माहिती निवडणूक विभागाचे गणेश खराबे यांनी दिली. एकूणच तालुक्यात होत असलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी प्रशासकीय तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. निवडणुकीसंदर्भातील सर्व प्रशिक्षणे, ईव्हीएम मशीनची पूर्तता, वाहतूक आराखडा, वाहन अधिग्रहण आणि आवश्यक असलेले मनुष्यबळ इ. प्रशासकीय तयारी पूर्ण झाली आहे, अशी माहिती निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार घोबाळे यांनी दिली.
फोटो ओळ : मंठा तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसंदर्भात मंठा तहसील कार्यालयात कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी उपस्थित अधिकारी, कर्मचारी वर्ग.