झोपलेल्या ४ वर्षीय मुलीच्या डोक्यावर घातले ट्रॅक्टर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:41 IST2021-01-08T05:41:39+5:302021-01-08T05:41:39+5:30
जालना : शेतात झोपलेल्या ४ वर्षीय मुलीच्या डोक्यावर ट्रॅक्टर घातल्याची घटना मंठा तालुक्यातील मंगरूळ शिवारात शनिवारी रात्री घडली. निशा ...

झोपलेल्या ४ वर्षीय मुलीच्या डोक्यावर घातले ट्रॅक्टर
जालना : शेतात झोपलेल्या ४ वर्षीय मुलीच्या डोक्यावर ट्रॅक्टर घातल्याची घटना मंठा तालुक्यातील मंगरूळ शिवारात शनिवारी रात्री घडली. निशा संदीप राठोड (वय ४, रा. मोहदरी ता. मंठा) असे मयत मुलीचे नाव आहे.
सुरेखा संदीप राठोड या मंठा तालुक्यातील मंगरूळ शिवारात गट नं २६४ मध्ये ऊस तोडणी करीत होत्या. त्यांची ४ वर्षांची मुलगी निशा राठोड ही झोपलेली होती. त्यावेळी ऊस भरण्यासाठी आलेल्या चालकाने हलगर्जीपणाने ट्रॅक्टर (क्र.एमएच.२१.बीक्यू१३६४) चालवून निशाच्या डोक्यावर टायर घातले. डोक्याला मार लागल्याने उपचारासाठी तिला दवाखान्यात नेले. परंतु, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी रविवारी रात्री सुरेखा संदीप राठोड यांच्या फिर्यादीवरून ट्रॅक्टरचालक पिंटू (पूर्ण नाव माहीत नाही) याच्याविरुद्ध मंठा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती पोहेकॉ चव्हाण यांनी दिली. अधिक तपास पोहेकॉ चव्हाण हे करीत आहेत.
अपघातात दोघे जखमी
जालना : भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याची घटना घनसावंगी तालुक्यातील गुरूपिंप्री येथे घनसावंगी ते जालना रस्त्यावर रविवारी घडली. या अपघातात पती-पत्नी जखमी झाले आहेत. फिर्यादीची चुलती व चुलता हे दुचाकीने (एमएच.२१.०४५८) घनसावंगी रोडने जालन्याकडे जात होते. गुरूपिंप्री येथील गोदावरी शाळेजवळ आल्यावर समोरून आलेल्या अज्ञात वाहनाने दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात दोघे जण गंभीर जखमी झाले. याप्रकरणी मुकेश विनायक राठोड यांच्या फिर्यादीवरून अज्ञात वाहनचालकाविरुद्ध घनसावंगी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
नूतन वसाहत येथे घरफोडी
जालना : घरी कोणी नसल्याचा फायदा घेऊन चोरट्यांनी घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून कपाटातील पाच ग्रॅम सोन्याचे धम्मचक्र, रोख १५ हजार रुपये, १५ साड्या व टीव्ही चोरून नेल्याची घटना जालना शहरातील प्रज्ञा बुध्दविहार नूतन वसाहत येथे सोमवारी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी सपना नागदेवते यांच्या फिर्यादीवरून कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोना दाभाडे करीत आहेत.