डिझेलचे दर वाढल्याने ट्रॅक्टर मशागत महागली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:04 IST2021-02-05T08:04:40+5:302021-02-05T08:04:40+5:30
जालना : डिझेलचे दर वाढल्याने ट्रॅक्टरचालकांनी शेती मशागतीच्या दरातही मोठी वाढ केली आहे. त्याचा फटका अस्मानी- सुलतानी संकटांनी होरपळणाऱ्या ...

डिझेलचे दर वाढल्याने ट्रॅक्टर मशागत महागली
जालना : डिझेलचे दर वाढल्याने ट्रॅक्टरचालकांनी शेती मशागतीच्या दरातही मोठी वाढ केली आहे. त्याचा फटका अस्मानी- सुलतानी संकटांनी होरपळणाऱ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बसत आहे.
मागील काही वर्षांत पशुधनाची कमी झालेली संख्या आणि मजुरांचा उद्भवणारा प्रश्न यामुळे शेतकऱ्यांनी यांत्रिकीकरणाचा वापर करून शेतीची मशागत सुरू केली आहे. ट्रॅक्टरद्वारे शेतातील बहुतांश कामे केली जातात. परंतु, डिझेलचे दर वाढले की शेतात ट्रॅक्टर घेऊन येणारेही शेती मशागतीचे दर वाढवून मागत आहेत. मागील वर्षी ट्रॅक्टरद्वारे नांगरणी करण्यासाठी सरासरी १२०० ते १५०० रुपये घेतले जात होते. परंतु, सध्या डिझेलचे दर वाढल्याने हा दर १८०० रुपयांवर गेला आहे. यापूर्वी मोगड्यासाठी जवळपास ६०० ते ६५० रुपये लागायचे आता हा खर्च ९०० रुपयांवर गेला आहे. पेरणीसाठी सरासरी १३०० ते १५०० रुपये घेतले जात होते. आता १५०० रुपये लागतात. एकूणच ट्रॅक्टरद्वारे केल्या जाणाऱ्या शेती मशागतीच्या कामांमध्ये एकरी ३०० ते ५०० रुपयांनी वाढ झाली आहे. याचा सर्वाधिक फटका आर्थिक घडी विस्कटलेल्या शेतकरी वर्गाला बसत आहे.
एकरी १० हजारांचा खर्च
शेती मशागत ते पीक काढणीसाठी शेतकऱ्यांना एकरी जवळपास दहा हजारांचा खर्च करावा लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडत आहे. नांगरणीसाठी १८०० रुपये, रोटा एक हजार रुपये, पेरणीसाठी एक ते दीड हजार रुपये, फवारणीसाठी जवळपास दीड हजार रुपये, काढणी, मळणी आणि वाहतूक खर्च वाढतो.
नांगरणी, पेरणी, मशागत आणि पीक काढणी ते वाहतूक हा खर्च पाहता शेतकऱ्यांना उत्पादन खर्च हाती पडणेही मुश्कील होऊन जात आहे. त्यात बाजारपेठेत मालाला दर कमी असला तर शेतकऱ्यांचे नुकसान होते.
गत काही महिन्यांपासू सतत डिझेलचे दर वाढत आहेत. शेतात ट्रॅक्टरद्वारे कामे करताना अधिकचे डिझेल लागते. शिवाय ट्रॅक्टरचेही नुकसान होण्याची भीती असते. शिवाय ट्रॅक्टरचा मेन्टेन्सही वाढत आहे. त्यामुळे ट्रॅक्टरधारकांचाही खर्च वाढला आहे. आर्थिक गणित जुळविण्यासाठी आम्हालाही नाइलाजास्तव मशागतीचे दर वाढवावे लागले.
- कृष्णा वाजे, तीर्थपुरी
शेतकरी अस्मानी- सुलतानी संकटांमुळे आर्थिक संकटात सापडला आहे. त्यात मशागतीच्या कामासाठी ट्रॅक्टरचालक अधिकचे पैसे मागत आहेत. पैशांची बचत व्हावी म्हणून शेतकरी स्वत: व कुटुंबातील सदस्यांना सोबत घेऊन अनेक कामे करीत आहेत.
- गणेश बोबडे, शेतकरी
पशुधनाची संख्या कमी झाल्याने आता शेतीतील बहुतांश कामे ही ट्रॅक्टरद्वारे केली जात आहेत. परंतु, डिझेलचे दर वाढल्याचे कारण पुढे करीत ट्रॅक्टरचालकांनी शेतातील कामे करण्याचे दर वाढविले आहेत. त्यामुळे खर्च वाढला आहे.
- भीमराव खामकर, आनंदवाडी
नांगरणी १५००
१८००
मोगडा ६५०
९००
सरी ६५०
९००
पेरणी १०००
१५००
रोटा ७५०
१०००
पिरी ७५०
१०००