खेळाडूंना ग्रेस गुणापासून वंचित राहण्याची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:20 IST2021-01-13T05:20:00+5:302021-01-13T05:20:00+5:30

जाफराबाद : कोरोना संसर्गजन्य आजाराच्या साथीमुळे शालेय क्रीडा स्पर्धा आयोजित करता आल्या नाहीत. त्यामुळे विविध खेळांत निपुण असलेल्या विद्यार्थ्यांना ...

Time to deprive players of grace points | खेळाडूंना ग्रेस गुणापासून वंचित राहण्याची वेळ

खेळाडूंना ग्रेस गुणापासून वंचित राहण्याची वेळ

जाफराबाद : कोरोना संसर्गजन्य आजाराच्या साथीमुळे शालेय क्रीडा स्पर्धा आयोजित करता आल्या नाहीत. त्यामुळे विविध खेळांत निपुण असलेल्या विद्यार्थ्यांना यंदा ग्रेस गुणापासून वंचित राहावे लागणार आहे.

दरवर्षी खेळातील कौशल्य दाखविणाऱ्या खेळाडूंचा शासनाद्वारे गौरव केला जात होता. तसेच त्यांच्या खेळातील कामगिरीची दखल घेत क्रीडा विभागाकडून खेळाडूंना ग्रेस गुण दिले जातात; परंतु गतवर्षी लॉकडाऊनमध्ये खेळाचे देशभर मैदाने बंद होती. त्यामुळे विद्यार्थी व विद्यार्थिनींना आपल्या खेळातील कौशल्य दाखविता आले नाही. याचा परिणाम १० वी व १२ वी परीक्षेतील बसलेल्या विद्यार्थ्यांवर होणार आहे. परिणामी, यंदा खेळण्याची अट शिथिल करावी, अशी मागणी होत आहे.

महाराष्ट्र शासनाकडून दरवर्षी जिल्हा पातळी, विभाग, राज्यस्तर व राष्ट्रीय पातळीवर खेळात नैपुण्य दाखविणाऱ्या खेळाडूंना क्रीडा विभागाकडून २५ गुण ग्रेस गुण दिले जातात. त्यात जिल्हा स्तरावर ५ गुण, विभाग स्तरावर १० गुण, राज्य स्तरावर २० गुण व राष्ट्रीय स्तरावर २५ गुण असे दिले जातात. ग्रेस गुणासाठी पात्र खेळाडूंचे प्रस्ताव क्रीडा विभागाकडून बोर्डाकडे पाठविले जातात. प्रचलित नियमानुसार १० वी ते १२ वी शिकत असलेल्या विद्यार्थ्याला स्पर्धेतील सहभागाबद्दल ग्रेस गुण दिले जातात.

चौकट

कोरोना परिस्थितीमुळे पूर्वी ९ वी ते ११ वी मध्ये खेळलेले विद्यार्थी यंदाच्या शैक्षणिक वर्षात ग्रेस गुणापासून वंचित राहू नयेत यासाठी सहानुभूतीपूर्वक विचार करून २०१९ मध्ये जिल्हा, विभाग, राज्यस्तर नैपुण्यप्राप्त केलेल्या खेळाडू विद्यार्थ्यांना त्यांच्या हक्काचे ग्रेस गुण देण्याची तरतूद करावी, अशी मागणी खेळाडूंसह प्राचार्य, मुख्याध्यापक, क्रीडाशिक्षक व निवृत्ती दिवटे, विनोद हिवराळे, संजय गौतम, धनंजय निकम व तालुका संयोजक प्रा. वाहेद पटेल, एकनाथ सुरूसे, अशोक कोल्हे, आत्माराम मरकड, गणेश भोपळे, आदींनी केली आहे.

Web Title: Time to deprive players of grace points

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.