Thunderstorm | वडीगोद्रीत चोरट्यांचा धुमाकूळ

वडीगोद्रीत चोरट्यांचा धुमाकूळ

लोकमत न्यूज नेटवर्क
वडीगोद्री : अंबड तालुक्यातील वडीगोद्री येथे रविवारी पहाटेच्या सुमारास रात्री चोरट्यांनी धुमाकूळ घातला. दोन दुकाने व बंद घर फोडून मुद्देमाल लंपास केल्याने एकच खळबळ उडाली आहे.
वडीगोद्री येथील औरंगाबाद- बीड राष्ट्रीय महामार्गावर विठाई कॉम्प्लेक्समध्ये रविवारी पहाटे चोरट्यांनी प्रथम बाहेर लावलेले सर्व बल्ब फोडले. इलेक्ट्रीकल व गुरुकृपा मेडीकल या दोन्ही दुकानांचे शटर वाकवून आतमध्ये प्रवेश केला. दोन्ही दुकानांच्या गल्ल्यातील चिल्लर लंपास केली. तसेच गुरुकृपा मेडिकलमध्ये नेण्यायोग्य काही सापडले नसल्यामुळे चॉकलेटवर चोरट्यांनी ताव मारला. तर समर्थ इलेक्ट्रीकल दुकानातील सहाशे ते सातशे रुपये चिल्लर, मोबाईल हेडफोन व ब्ल्यूटूथ लंपास केले.
तसेच अशोक नारायण आटोळे यांचे घर फोडले. त्यानंतर चोरट्यांनी अंतरवाली सराटी शिवारातील नाकोडा कलेक्शनच्या बाहेरील बल्ब फोडले. दुकानाचे शटर हात लावायच्या अगोदर दुकानाच्या आतमधील बांधलेले कुत्रे भुंकायला लागले आणि कुत्राच्या भुंकण्याच्या आवाजाने दुकान मालक जागे झाले. ही बाब लक्षात येताच चोरट्यांनी तेथून पळ काढला. तसेच अंतरवाली सराटी येथील देशी दारूचे दुकान फोडून देशीवर ताव मारला. ऐन सणासुदीच्या कालावधीत आणि निवडणूक कालावधीतील रात्रीची गस्त वाढलेली असतानाही चोरट्यांनी वडीगोद्रीत धुमाकूळ घातला. त्यामुळे व्यापाऱ्यांसह ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

Web Title: Thunderstorm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.