ग्रामपंचायत निवडणुकीच्या रिंगणात तीन हजार महिला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:25 IST2021-01-09T04:25:45+5:302021-01-09T04:25:45+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जालना : जिल्ह्यातील ४७५ ग्रामपंचायतींपैकी ४० ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाली आहे. त्यामुळे आता ४३५ ग्रामपंचायतींसाठी १५ ...

ग्रामपंचायत निवडणुकीच्या रिंगणात तीन हजार महिला
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जिल्ह्यातील ४७५ ग्रामपंचायतींपैकी ४० ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाली आहे. त्यामुळे आता ४३५ ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. जिल्ह्यातील १ हजार १४० प्रभागांसाठी ६ हजार ५७ उमेदवार रिंगणात उतरले असून, त्यामध्ये २ हजार ४९५ महिला उमेदवार आहेत.
कोरोनामुळे ग्रामपंचायतींच्या निवडणुका लांबणीवर पडल्या होत्या. कोरोनाचा पादुर्भाव कमी झाल्याने काही दिवसांपूर्वीच निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. जिल्ह्यात ४७५ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी तब्बल १२ हजारांपेक्षा अधिक उमेदवारांनी तहसील कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केले होते. दिनांक ४ जानेवारी ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख असल्याने बहुतांश जणांनी यादिवशी अर्ज मागे घेतले. तर जिल्ह्यात तब्बल ४० ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध झाल्या. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी बहुतांश महिलांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. दिनांक १५ जानेवारी रोजी ४३५ ग्रामपंचायतींसाठी मतदान होणार आहे. या निवडणुकीच्या रिंगणात ६ हजार ५७ उमेदवार उतरले असून, त्यापैकी २ हजार ४९५ महिला उमेदवारही आपले नशीब आजमावणार आहेत.
जालना तालुक्यात सर्वाधिक महिला उमेदवार
जालना तालुक्यातील ८५ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. यासाठी १ हजार ४३१ उमेदवार रिंगणात असून, तब्बल ८६४ महिला उमेदवार रिंगणात उतरल्या आहेत. जालना तालुक्यात सर्वाधिक महिला ग्रामपंचायतीची निवडणूक लढवत आहेत. त्याखालोखाल मंठा तालुक्यात ४७६ महिला उमेदवार रिंगणात आहेत. यावेळी जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुका चुरशीच्या होणार असल्याने सर्वांचे या निवडणुकीकडे लक्ष लागून राहिले आहे.
महिलांसाठी आरक्षित जागा किती?
मंठा तालुक्यात महिलांसाठी ४७३ जागा आरक्षित आहेत तर परतूर तालुक्यात ३११, जालनात ३१४, अंबडमध्ये ३४९, भोकरदन येथे १८६ जागा महिलांसाठी आरक्षित आहेत. गत पंचवार्षिक निवडणुकीच्या तुलनेत यावेळी हाेणाऱ्या निवडणुकीत महिलांचा सहभाग मोठा आहे. दिवसेंदिवस महिलांचा राजकारणातील सहभाग वाढत असून, १५ जानेवारी रोजी मतदान होणार असून, १८ जानेवारी रोजी निकाल जाहीर होणार आहे.