नागापूर खून प्रकरणाच्या तपासासाठी तीन पथके तैनात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:31 IST2021-02-10T04:31:27+5:302021-02-10T04:31:27+5:30
जालना : पाहेगाव येथील रमेश शेळके (५५) यांचा खून करून कारसह मृतदेह जाळून कार दरीत ढकलल्याची घटना जालना तालुक्यातील ...

नागापूर खून प्रकरणाच्या तपासासाठी तीन पथके तैनात
जालना : पाहेगाव येथील रमेश शेळके (५५) यांचा खून करून कारसह मृतदेह जाळून कार दरीत ढकलल्याची घटना जालना तालुक्यातील सेवली-पाहेगाव रस्त्यावरील नागापूर शिवारात सोमवारी सकाळी उघडकीस आली होती. याप्रकरणी सहा जणांविरुद्ध सेवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, तीन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. फरार असलेल्या तीन संशयितांचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे दोन, तर सेवली पोलिसांचे एक पथक तैनात करण्यात आले आहे. दरम्यान, रविवारी रात्री तीन वाजेपर्यंत मयत शेळके यांचे लोकेशन मेहकर येथे असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
रविवारी सायंकाळी रमेश शेळके हे चारचाकीने आपल्या मित्राला भेटण्यासाठी मेहकर येथे गेले होते. सोमवारी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास सेवली ते पाहेगाव रस्त्यावरील नागापूरजवळ आल्यावर अज्ञातांनी हल्ला करून त्यांना ठार केले व कारसह मृतदेह जाळला. त्यानंतर ५०० फूट खोल दरीत ढकलून दिले. सोमवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी मयताचा मुलगा अक्षय शेळके यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी रामप्रसाद नामदेव शेळके, एक महिला व सचिन रामप्रसाद शेळके, संदीप रामप्रसाद शेळके, विशाल काळे (रा. बाबूलतारा) व अर्जुन दंडाईत (रा. ब्राह्मणखेडा) यांच्या विरुद्ध सेवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पोलिसांनी मयताचा मोठा भाऊ रामप्रसाद शेळके, संदीप रामप्रसाद शेळके व एका महिलेला ताब्यात घेतले. यातील रामप्रसाद व संदीप यांना मंगळवारी न्यायालयात हजर केले असता, त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे, तर ताब्यात असलेल्या महिलेला कोरोनाची लागण झाल्याने तिला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी इंदलसिंग बहुरे यांनी दिली.
जमिनीच्या वादातून एकमेकांविरुद्ध गुन्हे दाखल
रमेश शेळके व त्यांचा मोठा भाऊ रामप्रसाद शेळके यांच्यात वर्षभरापासून जमिनीचा वाद सुरू आहे. यातून अनेक वेळा त्यांच्यात वादावादी झाली. त्यानंतर दोघांनीही एकमेकांविरुद्ध सेवली पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली.
सुपारी देऊन खून केल्याचा संशय
अर्जुन दंडाईत यांनी रमेश शेळके यांना फोन करून मेहकर येथे बोलावून घेतले होते. शेळके यांचा मोठा पुतण्या सचिन शेळके, विशाल काळे, अर्जुन दंडाईत हे फरार आहेत. दरम्यान, शेळके यांचा खून सुपारी देऊन केला असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.