लोकमत न्यूज नेटवर्कभोकरदन / रेणुकाई पिंपळगाव : तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई येथील तीन दुकानाला गुरूवारी रात्री लागलेल्या आगीत तीन दुकानातील साहित्य जळून खाक झाले आहे. यात ३० ते ३२ लाख रूपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या घटनेचा तलाठी काळे यांनी शुक्रवारी पंचनामा केला.पिंपळगाव रेणुकाई येथील व्यापारी प्रकाश गुप्ता हे गेल्या बारा वर्षापासून स्टील भांडी व फर्निचरचा व्यवसाय करतात. त्यांची भांड्यांची दुकान धावडा- भोकरदन चौफुली रस्त्यावर आहे. सोबतच त्यांच्या पत्नीचे देखील आरती ब्युटी पार्लर व एक शिलाई केंद्राचे दुकान त्यांच्या दुकानाला लागून आहे. गुरूवारी सायंकाळी पती- पत्नी दुकान बंद करुन घरी गेल्यानंतर रात्री साडे अकरा वाजेच्या दरम्यान अचानक दुकानातून धूर निघत असल्याचे शेजाऱ्यांनी गुप्ता यांना सांगितले. गुप्ता यांनी दुकानाकडे धाव घेतली असता ब्युटी पार्लरला आग लागल्याचे दिसले. त्यांनी आरडाओरडा केल्याने ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला. परंतु, आगीने रौद्ररूप धारण केले होते. दरम्यान अग्निशामक बंब घटनास्थळी दाखल झाल्याने आग आटोक्यात आली. या आगीत तांबे, पितळ, अॅल्युमिनियमची भांडी, कुलर, सोफासेट, एलईडी टीव्ही, पंखे, टेबल यासह अनेक संसारोपयोगी साहित्य व ब्युटी पार्लरमधील सौंदर्य प्रसाधने, शिलाई केंद्रातील साहित्य जळाले.
तीन दुकाने आगीत जळून भस्मसात..!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2019 00:36 IST