तीन रोहित्रे जळून खाक !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2020 00:31 IST2020-02-23T00:31:07+5:302020-02-23T00:31:21+5:30
घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथील रोहित्र जळण्याचा सिलसिला शनिवारीही कायम राहिला.

तीन रोहित्रे जळून खाक !
लोकमत न्यूज नेटवर्क
कुंभार पिंपळगाव : घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथील रोहित्र जळण्याचा सिलसिला शनिवारीही कायम राहिला. विशेष म्हणजे, दोन दिवसांपूर्वीच गावात तीन रोहित्रे बसविण्यात आली होती. मात्र, वीजचोरांच्या आकड्यांमुळे भार वाढल्याने शनिवारी एक -दोन नव्हे, तीन रोहित्र जळून खाक झाली.
दोन महिन्यांपूर्वी कुंभार पिंपळगाव येथील बकरी बाजार परिसरातील दोन व ग्रामपंचायत परिसरातील दोन रोहित्रे जळाली होती. मात्र, त्याची वेळेत दुरूस्ती झाली नाही. वीजचोरांचे आकडे वाढल्याने नंतर जायकवाडी वसाहत आणि बीएसएनएल कार्यालय परिसरातील रोहित्र जळून खाक झाले. सहा रोहित्रे बंद असल्याने वीज ग्राहकांना गैरसोयीचा सामना करावा लागत होता. ग्रामस्थांच्या पाठपुराव्यानंतर दोन दिवसांपूर्वीच तीन नवीन रोहित्रे गावात आली होती. मात्र, दोन रोहित्रे नादुरूस्त होती. ती बदलून आणल्यानंतर गावातील विविध भागांत लावण्यात आली. तीन रोहित्र बसतात न बसतात तोच वीजचोरांच्या आकड्यांचा भार वाढल्याने शनिवारी गावातील बसस्थानक परिसर, प्राथमिक आरोग्य केंद्र परिसर व तिरूपती कॉम्प्लेक्स परिसरातील तीन रोहित्रे जळून खाक झाली आहेत. लागलेली आग इतकी भीषण होती की रोहित्राचा स्फोट होतो की काय, अशी भीती व्यक्त केली जात होती. आग लागल्यानंतर महावितरण कंपनीचे कर्मचारी फिरकले नाहीत. गावातील सहा डीपी बंद असल्याने संपूर्ण गाव अंधारात आहे.