...तर वाघनखांचा सामना करावा लागेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2018 00:32 IST2018-01-20T00:32:16+5:302018-01-20T00:32:30+5:30
आमच्या अंगावर कोणी आले, तर आमच्या शिवसैनिकरूपी वाघांच्या नखांसोबत सामना करावा लागेल, असा इशारा राज्यमंत्री तथा जालना बाजार समितीचे सभापती अर्जुन खोतकर यांनी बदनापूर येथे दिला.

...तर वाघनखांचा सामना करावा लागेल
लोकमत न्यूज नेटवर्क
बदनापूर : आमच्या अंगावर कोणी आले, तर आमच्या शिवसैनिकरूपी वाघांच्या नखांसोबत सामना करावा लागेल, असा इशारा राज्यमंत्री तथा जालना बाजार समितीचे सभापती अर्जुन खोतकर यांनी बदनापूर येथे दिला.
बदनापूर येथील बाजार समिती आवारामध्ये आयोजित शिवसेनेच्या सदस्य नोंदणी व कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. खा. दानवे यांचे नाव न घेता ते म्हणाले की, सध्या त्यांचे भाषण माझ्या नावाने सुरू होते व माझ्या नावानेच संपते. त्यांना जिथ उत्तर द्यायचे तिथे मी देईल. मी त्यासाठी समर्थ आहे. लोकशाहीत सर्वांना बोलण्याचा अधिकार आहे. आम्ही कुणाच्याही शेपटीवर पाय दिला नाही. मात्र त्यांनी आमच्या शेपटीवर पाय दिला आहे. आमची वाघनखे बाहेर पडल्यानंतर कोथळा बाहेर निघेल. अंगावर याल तर याद राखा, असा इशाराही त्यांनी दिला.
नांदेडचे पालकमंत्री पद मी स्वत: रामदास कदम यांना देण्याची विनंती केली. कारण कदम हे आमचे नेते आहेत. मला कोणताही जिल्हा चालेल. या तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मेहनती असून, या भागातील जनता शिवसेनेमागे आहे. पुढील विधानसभा व लोकसभेचे मतदान केवळ शिवसेनेच्याच बाजूने झाले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.
जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर म्हणाले की, भाजप मित्रपक्ष आता केवळ नावालाच असून, आता मुख्य शत्रुपक्ष तोच झाला आहे. खोतकरांची बदनामी करून आपले नेतृत्व संपवायचे कुटील राजकारण सध्या होत आहे. आपापसातील तक्रारी, कुरबुरी बाजुला ठेवून जास्तीत जास्त सदस्य नोंदणी करावीे, असे आवाहन केले. माजी आ. संतोष सांबरे, किसान सेना जिल्हासंघटक भानुदास घुगे, तालुकाप्रमुख जयप्रकाश चव्हाण युवा सेनेचे जिल्हा प्रमुख भाऊसाहेब घुगे यांचीही यावेळी भाषणे झाली.
कार्यक्रमास जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर, उपजिल्हाप्रमुख पंडित भुतेकर, भगवान कदम, जि. प. सदस्य कैलास चव्हाण, गणेश डोळस, भारत मदन, श्रीराम कान्हेरे, राजेश जºहाड, राजेंद्र जºहाड आदी उपस्थित होते.