मंठा : काँग्रेसचे विधान परिषदेतील प्रतोद, आमदार राजेश राठोड यांना मागील तीन ते चार दिवसांपासून मोबाईल फोनवरून धमक्या देण्यात येत आहेत. या प्रकरणी मंठा पोलीस ठाण्यात संबंधिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजपूत भामटा या प्रवर्गातील भामटा हा शब्द वगळून टाकल्यास राजपूत भामटा समाजासह बंजारा तसेच संपूर्ण व्हीजेएनटी समाजाच्या आरक्षणावर गदा येणार आहे. त्यामुळे राज्य सरकारने असा प्रयत्न करू नये, या विषयावर आमदार राठोड गेल्या अनेक वर्षांपासून आग्रही आहेत. यासंदर्भात आमदार राठोड यांना काही समाज कंटकाकडून धमक्या देण्यात येत आहेत.
फिर्यादीत म्हटले आहे की, करणी सेनेचे देवीसिंग बारवाल यांनी आमदार राठोड यांना फोन करून, विधान परिषदेत राजपूत भामटा समाजाच्या बोगस जात प्रमाणपत्रासंदर्भात उपस्थित केलेले प्रश्न समाजाच्या विरोधात आहेत, तुम्ही नेहमी प्रत्येक अधिवेशनात राजपूत समाजालाच टार्गेट करतात, तुम्हांला समजायला पाहिजे, तुम्ही लोकप्रतिनिधी आहात, अशा शब्दांत धमकीवजा ओरडून सांगितले, आमदारांनी त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी काहीच ऐकून न घेता त्यांनी अरेरावीची भाषा वापरली. याप्रकरणी राठोड यांचे सहाय्यक राजेश चव्हाण यांच्या फिर्यादीवरून पाेलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.
या धमकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या जीवितास काही हानी झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी हि राज्य शासनाची राहील, त्यामुळे त्यांना उच्चस्तरीय संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी तक्रार अर्जाद्वारे मंठा पोलीस स्टेशनला आणि जालना पोलीस अधिक्षक यांच्याकडे करण्यात आली आहे.