जालना : अफगाणिस्तानमध्ये निर्माण झालेल्या तणावामुळे जिल्ह्यातील व्यापाऱ्यांसह सर्वसामान्यांची डोकेदुखी वाढणार आहे. अफगाणिस्तानातून आयात होणाऱ्या ड्रायफ्रूट्सच्या आयातीवर या तणावाचा परिणाम झाला आहे. त्यामुळे आयात थांबली तर ड्रायफ्रूट्सचे बाजारपेठेतील दर वाढण्याची चिन्हे आहेत.
बदलत्या जीवन शैलीत अनेकांनी ड्रायफ्रूट्स खाण्यावर मोठा भर दिला आहे. बहुतांश ड्रायफ्रूट्स हे अफगाणिस्तान व परिसरातून आयात केले जातात. परंतु, सध्या तालिबान्यांनी अफगाणिस्तान काबिज करण्याची मोहीम हाती घेतली आहे. त्यामुळे विदेशी आयात- निर्यात बंद पडली आहे. याचा परिणाम ड्रायफ्रूट्सच्या दर वाढीवर होणार आहे.
जिल्ह्यात मोजकाच स्टॉक शिल्लक
अफगाणिस्तानातून आयात होणारा माल विविध ठिकाणी स्टॉक केला जातो.
जिल्ह्यातील व्यापारी तो माल विकत घेऊन किरकोळ विक्रेत्यांना देतात.
जिल्ह्यातील व्यापाऱ्यांकडे सध्या मोजकाच स्टॉक शिल्लक असल्याचे सांगितले जाते.
दर पूर्ववत होणे कठीण
ड्रायफ्रूट्स हे अफगाणिस्तान व परिसरातून आयात केले जातात. त्यानंतर देशातील विविध बाजारपेठेत त्याची विक्री केली जाते. परंतु, सध्या अफगाणिस्तान मध्येच तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. त्यांच्या विदेशी आयात- निर्यात धोरणांवरही बाजारपेठेतील ड्रायफ्रूट्सचे दर ठरणार आहेत.
- राहुल रुणवाल, व्यापारी
कोरोना महामारीत ड्रायफ्रूट्सच्या दरावर परिणाम झाला आहे. आता ज्या अफगाणिस्तान व परिसरातून ड्रायफ्रूट्स अधिक प्रमाणात आयात केले जातात त्या भागातच मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण झाला आहे. त्यामुळे भविष्यात दरात आणखी तेजी येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
- गौतम श्रीश्रीमाल, व्यापारी