दहा उमेदवारांना पडली समसमान मते; चिठ्ठीतून निवडले विजेते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:32 IST2021-01-19T04:32:33+5:302021-01-19T04:32:33+5:30

बदनापूर : तालुक्यातील ५४ ग्रामपंचायतींची मतमोजणी सोमवारी पूर्ण झाली. त्यात तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींमधील दहा उमेदवारांना समसमान मते मिळाल्याने चिठ्ठीद्वारे ...

Ten candidates got equal votes; Winners selected by lot | दहा उमेदवारांना पडली समसमान मते; चिठ्ठीतून निवडले विजेते

दहा उमेदवारांना पडली समसमान मते; चिठ्ठीतून निवडले विजेते

बदनापूर : तालुक्यातील ५४ ग्रामपंचायतींची मतमोजणी सोमवारी पूर्ण झाली. त्यात तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींमधील दहा उमेदवारांना समसमान मते मिळाल्याने चिठ्ठीद्वारे पाच जणांना विजयी घोषित करण्यात आले. यात दोन सख्ख्या भावांचा समावेश होता. चिठ्ठीत लहान भावाचे नाव आल्याने त्याला विजयी करण्यात आले.

तालुक्यातील तळणी-लोधेवाडी या ग्रामपंचायतीमध्ये वाॅर्ड क्रमांक एक मध्ये लोखंडे उत्तम कचरू व लोखंडे जालिंधर कचरू हे दोन सख्खे भाऊ एकाच वाॅर्डातून वेगवेगळ्या पॅनलकडून उभे होते. या ग्रामपंचायतीची मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर या दोन सख्ख्या भावांना समसमान प्रत्येकी २०९ मते मिळाली. त्यानंतर या दोघांचा चिठ्ठीद्वारे निकाल जाहीर करण्यात आला. त्यामध्ये जालिंदर कचरू लोखंडे या लहान भावाच्या नावाची चिठ्ठी निघाल्यामुळे त्यांना तहसीलदार छाया पवार यांनी विजयी घोषित केले. तसेच तालुक्यातील पिरसावंगी येथील वाॅर्ड क्रमांक तीनमधून रंजना संपत मिसाळ व सोरमारे जनाबाई भगवान या दोन्ही उमेदवारांना प्रत्येकी ९७ मते मिळाली होती. चिठ्ठीद्वारे जनाबाई भगवान सोरमारे यांना विजयी घोषित करण्यात आले. शेलगाव येथील वाॅर्ड क्रमांक ४ मधून अनुसूचित जाती या प्रवर्गातून इंदूबाई अनिल आहोळ व अमोल विलास तुपे या दोन उमेदवारांना प्रत्येकी २९६ मते मिळाली. त्यामध्ये चिठ्ठीद्वारे अमोल विलास तुपे यांना विजयी घोषित करण्यात आले. दाभाडी येथील वाॅर्ड क्रमांक ४ मध्ये अर्चना नागोराव बकाल व सुवर्णा दगडू बकाल या दोन उमेदवारांना प्रत्येकी ३८७ मते मिळाली. चिठ्ठीद्वारे अर्चना नागोराव बकाल यांना विजयी घोषित करण्यात आले. डोंगरगाव दा येथील वाॅर्ड क्रमांक एकमध्ये माधुरी नारायण खरात व लताबाई अरुण राजळे यांना प्रत्येकी १९१ मते मिळाली. चिठ्ठीद्वारे माधुरी नारायण खरात यांना विजयी घोषित करण्यात आले.

भाजप, महाविकास आघाडीचा दावा

तालुक्यातील ३९ ग्रामपंचायती भाजपच्या ताब्यात आल्या असून, एकूण ३०६ सदस्य निवडून आल्याचा दावा आ. नारायण कुचे यांनी केला आहे. तर माजी आ. संतोष सांबरे यांनी या मतमोजणीत अनेक ग्रामपंचायती स्वबळावर शिवसेनेच्या ताब्यात आल्या असून, काही ठिकाणी महाविकास आघाडीसोबत सरपंच होणार आहे. या विजयामुळे ग्रामीण भागातील जनतेचा कल शिवसेना व महाविकास आघाडीच्या बाजूने असल्याचा दावा केला जात आहे.

वाहतूक विस्कळीत

मतमोजणीचे ठिकाण जालना-औरंगाबाद महामार्गावर असल्याने येथे मतमोजणीसाठी आलेले उमेदवार, त्यांचे प्रतिनिधी, पॅनलप्रमुख व अन्य समर्थकांची मोठी गर्दी होती. कृषी संशोधन केंद्रापासून ते सोमठाणा फाट्यापर्यंत या महामार्गावरील एका बाजूची वाहतूक पूर्ण बंद केली होती. त्यामुळे या महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती.

Web Title: Ten candidates got equal votes; Winners selected by lot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.