टेंभुर्णी पोलिसांनी रोखला बालविवाह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:21 IST2021-01-13T05:21:26+5:302021-01-13T05:21:26+5:30
जाफराबाद तालुक्यातील पोखरी येथील एका अल्पवयीन मुलीचा विवाह तालुक्यातीलच देळेगव्हाण येथील मुलासोबत रविवारी पार पडणार होता. याची माहिती टेंभुर्णी ...

टेंभुर्णी पोलिसांनी रोखला बालविवाह
जाफराबाद तालुक्यातील पोखरी येथील एका अल्पवयीन मुलीचा विवाह तालुक्यातीलच देळेगव्हाण येथील मुलासोबत रविवारी पार पडणार होता. याची माहिती टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे सपोनि. ज्ञानेश्वर पायघन यांना मिळाली होती. पायघन यांच्या सूचनेनुसार फौजदार ज्ञानेश्वर साखळे व त्यांच्या पथकाने पोखरी येथील विवाहस्थळी धाव घेतली. त्यांनी मुलीच्या वयाबाबत खातरजमा केली असता मुलगी अल्पवयीन असल्याचे निष्पन्न झाले. साखळे यांनी दोन्हीकडील मंडळींना हा बालविवाह कायद्याने गुन्हा असल्याने सांगून त्यांचे समुपदेशन केले. त्यानंतर वर व वधू पक्षाकडील नातेवाईकांनी हा विवाह रोखण्याचे लगेच मान्य केले. हा बालविवाह रोखण्यासाठी फौजदार ज्ञानेश्वर साखळे यांच्यासह पोलीस कर्मचारी आनंदा मोहिते, प्रदीप धोंडगे, जावळे, गजेंद्र भुतेकर आदींनी प्रयत्न केले. यासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य दत्तू पंडित यांनीही सहकार्य केले.
अंत्यविधीमुळे लांबला होता विवाह
पोखरी येथे होणारा हा बालविवाह शनिवारी दुपारीच संपन्न होणार होता. मात्र, गावात कोणाचे तरी निधन झाल्यामुळे हा विवाह रविवारी करण्याचे निश्चित झाले होते. मात्र, टेंभुर्णी पोलीस वेळेवर विवाहस्थळी दाखल झाल्याने तो बालविवाह रोखला गेला.