तहसील, पंचायत समिती परिसराला अस्वच्छतेचा विळखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:06 IST2021-02-05T08:06:36+5:302021-02-05T08:06:36+5:30
बदनापूर : शहरातील तहसील व पंचायत समिती कार्यालयाला अस्वच्छतेचा विळखा पडला आहे. नागरिकांना स्वच्छतेचे धडे देणाऱ्या प्रशासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांचेच ...

तहसील, पंचायत समिती परिसराला अस्वच्छतेचा विळखा
बदनापूर : शहरातील तहसील व पंचायत समिती कार्यालयाला अस्वच्छतेचा विळखा पडला आहे. नागरिकांना स्वच्छतेचे धडे देणाऱ्या प्रशासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांचेच स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत आहे. शिवाय कामानिमित्त या कार्यालयांमध्ये येणाऱ्या नागरिकांना मुलभूत सोयी-सुविधाही मिळत नाहीत.
तालुक्याची निर्मिती झाल्यानंतर शासनाकडून बदनापूर येथे तहसीलची नूतन इमारत उभी करण्यात आली. या इमारतीत दुय्यम निबंधक, भूमिअभिलेख, कृषी विभाग, महसूल विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, वनिकरण विभाग आदी विविध विभागाचे कार्यालय या भव्य सुसज्ज इमारतीत आहेत. पंचायत समिती परिसरात बालकल्याण, गटशिक्षण, आरोग्यसह कार्यालय आहेत. तहसील, पंचायत समिती कार्यालय परिसरात तीन ते चार वर्षांपूर्वी स्वच्छतागृह बांधण्यात आले आहे. परंतु, ते कायम कुलूपबंद असते. या भागात मोठमोठे झाडेझुडपे उगवले असून, ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसह नागरिक आपल्या शासकीय कामासाठी व जमीन खरेदी-विक्रीसाठी तहसील, पंचायत समिती कार्यालयात येतात. परंतु स्वच्छतागृहाचा अभाव असल्याने त्यांना आडसो शोधावा लागत आहे. एकीकडे शौचालय बांधकाम, त्याचा वापर, स्वच्छता आदींचे धडे नागरिकांना प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी देत आहेत. परंतु, त्यांनाच स्वच्छतेसह इतर सुविधा उपलब्ध करून देण्याचा विसर पडला आहे. तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन नागरिकांची होणारी गैरसोय दूर करावी, अशी मागणी होत आहे.
येथील तहसील कार्यालय परिसरात लाखो रूपये खर्च करून स्वच्छतागृह बांधलेले आहे. परंतु, त्याचा सर्वसामान्यांना वापर करता येत नाही. शिवाय परिसरात अस्वच्छता पसरली आहे. त्यामुळे बंद असलेले स्वच्छतागृह सर्वसामान्यांसाठी खुले करावे, परिसरात स्वच्छता ठेवावी.
राजेंद्र जऱ्हाड
शिवसेना शहरप्रमुख, बदनापूर