जालना : कोरोनामुळे आयात-निर्यातीवर झालेला परिणाम आणि बाजारपेठेत कमी झालेली मालाची आवक, यामुळे मसाल्यांचे दर गतवर्षीच्या तुलनेत काही प्रमाणात वाढले आहेत. मसाल्याचे दर वाढल्याने स्वयंपाकाची चव महागत असल्याचे चित्र आहे.
कोरोनाच्या प्रादुर्भावात जीवनावश्यक वस्तूंचे दर दिवसेंदिवस वाढू लागले आहेत. इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. त्यात स्वयंपाकाला चव देणाऱ्या मसाल्यांचे दरही दिवसेंदिवस वाढू लागले आहेत. त्यामुळे महिलांचे आर्थिक गणित बिघडू लागले असून, हे दर कमी करण्याची मागणी होत आहे.
महागाई पाठ सोडेना!
गॅस, खाद्यतेलाची दरवाढ कमी होण्याची प्रतीक्षा असताना, आता मसाल्यांचेही दर वाढू लागले आहेत. वाढत्या दरवाढीमुळे आमचे महिन्याचे बजेट पूर्णत: कोलमडून जात आहे. कोरोनामुळे असलेल्या अडचणीत होणारी दरवाढ ही अनेकांसाठी त्रासदायक ठरत आहे.
- क्षितिजा कामे, गृहिणी
कोरोना महामारीत अनेकांच्या हातचे काम गेले आहे. आता कुठे परिस्थिती पूर्ववत होऊ लागली आहे, परंतु त्यात स्वयंपाक गॅस, खाद्यतेलासह मसाल्यांची दरवाढ ही डोकेदुखी ठरू लागली आहे. ही दरवाढ मागे घेण्यासाठी शासनानेच पुढाकार घेणे गरजेचे आहे.
- नीता झांजे, गृहिणी.
म्हणून वाढले मसाल्यांचे दर
कोरोनामध्ये आयात-निर्यातीवर मोठा परिणाम झाला आहे. मोठ्या बाजारपेठेतही आम्हाला मसाले अधिक दराने मिळू लागले आहेत. परिणामी, किरकोळ बाजारात दरवाढ होऊ लागली आहे.
- शिवाजी देशमुख, व्यापारी.
बाजारपेठेमध्ये मसाल्यांची आवक कमी प्रमाणात झाली आहे. मसाल्यांची आवकच कमी असल्याने दर वाढ होत आहे. त्यात कोरोनातील बाजारपेठेवरील परिणामही या दरवाढीला कारणीभूत ठरत आहेत.
- प्रथमेश बावस्कर, व्यापारी.