जिल्ह्यात टंचाईग्रस्त भागात टँकर पोहोचेना

By Admin | Updated: June 2, 2014 00:54 IST2014-06-02T00:27:55+5:302014-06-02T00:54:11+5:30

जालना : जिल्ह्यात टंचाई कृती निवारण आराखड्याअंतर्गत सुधारित आराखड्यास विलंब झाल्याने अद्यापही काही गावांसाठी टँकरचे प्रस्ताव असूनही तेथे टँकर पोहोचलेले नाही

Tanks in scarcity-affected areas in the district | जिल्ह्यात टंचाईग्रस्त भागात टँकर पोहोचेना

जिल्ह्यात टंचाईग्रस्त भागात टँकर पोहोचेना

जालना : जिल्ह्यात टंचाई कृती निवारण आराखड्याअंतर्गत सुधारित आराखड्यास विलंब झाल्याने अद्यापही काही गावांसाठी टँकरचे प्रस्ताव असूनही तेथे टँकर पोहोचलेले नाही. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने सुमारे ४ कोटींचा टंचाई कृती आराखडा तयार करून जिल्हाधिकार्‍यांकडे सादर केला होता. त्यास मंजुरी मिळाल्यानंतर संबंधित उपाययोजनांची कामे सुरू झाली. मात्र तालुका टंचाई निवारण कृती समितीच्या बैठका काही ठिकाणी उशिराने झाल्याने तेथील सुधारित आराखडेही विलंबाने तयार झाले; परंतु हे आराखडे जिल्हाधिकार्‍यांकडे पाठविण्यात आलेले नव्हते. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या गेल्या आठवड्यात झालेल्या सर्वसाधारण सभेत काही सदस्यांनी आक्षेप नोंदविला होता. विशेषत: बदनापूर तालुक्यातील कुसळी, नानेगाव, कडेगाव या गावांमध्ये टंचाईमुळे टँकरच्या मागणीचा प्रस्ताव आलेला असतानाही त्यावर संबंधित कार्यालयाकडून काहीच कार्यवाही झालेली नव्हती. विशेष म्हणजे घनसावंगी तालुक्यातील कोठी येथील पाणीपुरवठा योजना बंद आहे. याबाबत संबंधित लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा केल्यानंतरही ग्रामसेवकाकडून प्रस्ताव तयार करण्यात आला नाही, असा आरोप जि.प. सदस्य सतीश टोपे यांनी केला होता. याबाबत ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता एस.एम. कदम यांना विचारणा केली असता ते म्हणाले की, आमच्याकडे जे प्रस्ताव आले, त्यावर तातडीने कार्यवाही करण्यात आलेली आहे. मात्र काही प्रस्ताव तहसील किंवा उपविभागीय कार्यालयात प्रलंबित असू शकतात. सुधारित आराखडा मंजुरीसाठी पाठविण्यात आलेला असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यात सद्यस्थितीत सहा टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Tanks in scarcity-affected areas in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.