तांदुळवाडी खुर्द येथे गोडावून फोडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:56 IST2021-02-06T04:56:07+5:302021-02-06T04:56:07+5:30
जालना : एका कंपनीचे गोडावून फोडून चोरट्यांनी कापसाच्या १५ गाठी चोरून नेल्याची घटना जालना तालुक्यातील तांदुळवाडी खुर्द येथे गुरुवारी ...

तांदुळवाडी खुर्द येथे गोडावून फोडले
जालना : एका कंपनीचे गोडावून फोडून चोरट्यांनी कापसाच्या १५ गाठी चोरून नेल्याची घटना जालना तालुक्यातील तांदुळवाडी खुर्द येथे गुरुवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास घडली. चोरट्यांनी १ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.
तांदुळवाडी खुर्द शिवारात आदित्य वेअर हाऊस अॅण्ड मल्टी सर्विसेसचे गोडावून आहे. या गोडावूनमध्ये कापसाच्या गाठी ठेवण्यात आलेल्या आहेत. याच्या सुरक्षेसाठी सुरक्षारक्षकही तैनात होता. परंतु, गुरुवारी पहाटे सुरक्षारक्षक संभाजी कापसे यांची तब्बेत खराब झाल्याने ते घरी निघून गेले. याच संधीचा फायदा घेत चोरट्यांनी गोडावूनच्या शटरचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. गोडावूनमधील १ लाख ५० हजार रुपये किमतीच्या कापसाच्या १५ गाठी चोरट्यांनी लंपास केल्या. गुरुवारी सकाळी सुरक्षारक्षकाला चोरी झाल्याचे समजले. यानंतर पोलिसांना कळविण्यात आले. माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर, पोनि. शामसुंदर कौठाळे, वाघमारे यांनी घटनास्थळी भेट दिली. याप्रकरणी संभाजी कापसे यांच्या फिर्यादीवरून चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकॉ वाघमारे हे करीत आहेत.