ऑक्टोबरची गोड छाटणी सप्टेंबरमध्येच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:35 IST2021-09-04T04:35:50+5:302021-09-04T04:35:50+5:30
विष्णू वाकडे जालना : द्राक्ष उत्पादक शेतकरी द्राक्षाची गोड छाटणी ऑक्टोबर महिन्यात करतात; परंतु मागील दोन वर्षांत कोरोनामुळे झालेले ...

ऑक्टोबरची गोड छाटणी सप्टेंबरमध्येच
विष्णू वाकडे
जालना : द्राक्ष उत्पादक शेतकरी द्राक्षाची गोड छाटणी ऑक्टोबर महिन्यात करतात; परंतु मागील दोन वर्षांत कोरोनामुळे झालेले नुकसान पाहता धारकल्याण (ता. जालना) येथील एका शेतकऱ्याने ऑक्टोबरची गोड छाटणी सप्टेंबरच्या प्रारंभीच केली आहे.
धारकल्याण येथील सुंदर दिनकर इंगोले हे द्राक्षाचे उत्पादन घेतात. कुटुंबातील सदस्यांच्या सहकार्यातून त्यांनी १० एकरांत द्राक्षबाग उभी केली आहे. मागील दोन हंगामात कोरोनामुळे द्राक्षे आठ ते दहा रुपये प्रति किलोने विक्री करावी लागली होती. त्यामुळे केलेला खर्च मातीत गेला आणि बँकेच्या कर्जाचे हप्तेही त्यांना भरता आले नाहीत. द्राक्ष उत्पादक ऑक्टोबर महिन्यामध्ये गोड छाटणी घेतात. जेणेकरून भुरी, डाउनीसारख्या रोगांना बागा बळी पडत नाहीत; परंतु इंगोले यांनी कोरोनामुळे गत दोन हंगामात आलेले कटू अनुभव आणि कोरोनाची तिसरी लाट पाहता सप्टेंबरमध्येच छाटणी घेतली आहे. तिसरी लाट आल्यानंतर द्राक्षे विक्रीसाठी आली तर कवडीमोल भावाने विकावी लागणार आहेत. त्यामुळे त्यांनी ही जोखीम पत्करून दोन एकरवरची छाटणी पूर्ण केली आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात द्राक्षे विक्रीस येतील, असा त्यांचा अंदाज असून, त्यातून पाच ते सहा लाख रुपये प्रति एकर उत्पन्न मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. इंगोले यांच्या या धाडसी प्रयोगाची पाहणी करण्यासाठी इतर द्राक्ष उत्पादक शेतकरी त्यांच्या शेतास भेट देत आहेत.
कोट
गत दोन हंगामात कोरोना संकटामुळे द्राक्ष उत्पादकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. ४० ते ५० रुपये प्रति किलो विक्री होणारी द्राक्षे अवघ्या दहा ते बारा रुपये किलोने विकावी लागली. जालन्यात जर कोल्ड स्टोरेजची व्यवस्था असती तर नक्कीच नुकसानीची पातळी तीव्रता कमी झाली असती. त्यासाठी कोल्ड स्टोरेज उभारणीसाठी विशेष प्रयत्न होणे गरजेचे आहे.
- सुरेश क्षीरसागर, द्राक्ष उत्पादक
कोट
हवामान बदलाच्या परिणामाचा द्राक्ष उत्पादक सामना करताना बरेचसे बदल घडवून आणले होते. नेमकी द्राक्षे विक्रीला आल्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला. त्यामुळे यंदा अगोदर छाटणी घेतली जात आहे. हा प्रयोग सुंदर इंगोले, श्रीकांत क्षीरसागर यांनी केला असून, या पद्धतीचे काम परिसरात आता सुरू होणार आहे.
- सोपान क्षीरसागर, प्रगतिशील शेतकरी
फोटो कॅप्शन : धारकल्याण येथील द्राक्ष उत्पादक सुंदर इंगोले यांच्या शेतात द्राक्ष बागेवर सुरू असलेली छाटणी.