सुलतान, युवराज; रेडे की सेलिबे्रटीज ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2019 01:04 IST2019-02-03T01:04:01+5:302019-02-03T01:04:06+5:30
: सुलतान, युवराज, कोहिनूर, राम रहिम, कालिया, बेटिंग राजा, शीला, लंका, पद्मा, ललकार... ही माणसांची वाटतात. पण ही आहेत रेडे आणि म्हशींची नावे. विशेष म्हणजे नावासारखांचे ते दिसायलाही तसेच आहेत

सुलतान, युवराज; रेडे की सेलिबे्रटीज ?
दीपक ढोले ।
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : सुलतान, युवराज, कोहिनूर, राम रहिम, कालिया, बेटिंग राजा, शीला, लंका, पद्मा, ललकार... ही माणसांची वाटतात. पण ही आहेत रेडे आणि म्हशींची नावे. विशेष म्हणजे नावासारखांचे ते दिसायलाही तसेच आहेत. त्यामुळे पशुधन मेळाव्यात आलेला प्रत्येकजण अरे बापरे काय जनावरं आहे हे...
पशुधन मेळाव्यात पंजाब, हरियाणा येथून आलेले कोट्यवधी रुपये किंमत असलेले सुलतान, युवराज आणि कोहिनूर हे रेडे पशु-प्रदर्शनाचे आकर्षण ठरत आहे.
युवराज... नावासारखाच खमक्या
हरियाणा येथून आलेला युवराज या पशुप्रदर्शनाच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. युवराजचे वजन आहे, १५ क्विंटल. पण गडी शांत व संयमी आहे. त्याचे मालक करमवीर सिंग यांनी युवराजं तर कौतुकच केलं. ते म्हणाले, युवराजच्या खाण्यावर दररोज ४ हजार रुपये खर्च होतात. युवराजने २९ वेळा अखिल भारतीय पशु प्रदर्शनामध्ये विजेतेपद पटकाविले आहे. तर युवराजच्या वीर्य विक्रीतून तीनशे रुपये प्रति डोस या दराप्रमाणे दरवर्षी ३५ हजार डोस विकले जातात. यातून जवळपासून ८० लाखांचे उत्पन्न करमवीर सिंग यांना मिळते. तसेच दरवर्षी पुश- प्रदर्शनात भाग घेऊन पंधरा लाख रुपयांचे उत्पन्न ठरलेलेच. युवराजला विदेशातूनही मोठी मागणी असल्याचेही करमवीर सिंग यांनी सांगितले. तर अशा या युवराजची किंमत आहे ९ कोटी.
कोहिनूर... पंजाबचा राजा
स्वभावाने शांत आणि संयमी असलेला कोहिनूरला पंजाबचा राजा अशीच ओळख आहे. १५०० किलो वजन असलेल्या कोहिनूरची किंमत आज कोटीत आहे. त्याला देशातून मोठी मागणी आहे. कोहिनूरला दररोज ५ किलोचे धान्य लागते. तसेच ५ लिटर दूधही त्याला देण्यात येते.
दंगली गाजवणारा सुलतान!
सुलतान पशुधन प्रदर्शनात गर्दी खेचणारा आणि त्याच्यासोबत सेल्फी घ्यायला मजबूर करणारा भिडू. तर तो आला आहे हरियाणातून. प्रदीपसिंग चौधरी हे त्याचे मालक़ सुलतानचे वजन आहे. १६०० किलो. तेल लावून आलेल्या पहिलवानासारखाच तो दिसतो. जसा दिसतो तशीच त्याची कर्तबगारीही आहे. सुलतानने १५ राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत भाग घेतला असून, १२ स्पर्धेत त्याने विजेतेपद पटकावले आहे. ६ फूट उंच असलेल्या सुलतानला दररोज १५ किलो धान्य लागते.
माणिक बादशाह प्रथमच मैदानात
जालना शहरातील रेडेही पशुधन प्रदर्शनात सहभागी झाले आहेत. शहरातील शेख लतिफ यांचा माणिक बादशाहने प्रथमच पशुप्रदर्शनात भाग घेतला आहे. ९ क्विंटल वजनाचा माणिक बाहशाह हा जाफराबादी जातीचा आहे. त्याला दररोज १ हजार रुपये खर्च लागतो. माणिक बादशाहचे मालक शेख लतीफ म्हणाले, आम्ही प्रथमच पशु-प्रदर्शनात भाग घेतला आहे