औरंगाबादच्या प्रेमीयुगुलाची दावलवाडीजवळ विष पिऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 14:52 IST2018-02-17T14:52:05+5:302018-02-17T14:52:39+5:30
औरंगाबाद येथील एका प्रेमी युगुलाने तालुक्यातील दावलवाडी फाटयाजवळ विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना आज पहाटे उघडकीस आली.

औरंगाबादच्या प्रेमीयुगुलाची दावलवाडीजवळ विष पिऊन आत्महत्या
बदनापूर ( जालना ) : औरंगाबाद येथील एका प्रेमी युगुलाने तालुक्यातील दावलवाडी फाटयाजवळ विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना आज पहाटे उघडकीस आली. हे प्रेमी युगुल बुधवारपासून (दि.14) औरंगाबाद येथून बेपत्ता होते.
औरंगाबाद येथील कोमल अशोक गरुड (१७) व शशांक सुभाष जैस्वाल (२१) या दोघांचे एकमेकांवर प्रेम होते. ते दोघे बुधवारी (दि.१४) व्हॅलेनटाईन डेच्या दिवशी कोणास काही माहिती न देता घरातून निघून गेले होते. याबाबत कोमलच्या पालकांनी गुरुवारी (दि.१५) औरंगाबाद येथील सिटी चौक पोलिस स्टेशनमध्ये शशांक याने कोमलचे अपहरण केल्याची तक्रार नोंदवली होती.
दरम्यान, आज पहाटे दावलवाडी फाटयाजवळ मृत अवस्थेत अनोळखी युवक - युवतीचे प्रेत आढळून आले. मृतदेहा शेजारी विषारी द्रव्य मिश्रीत पिण्याच्या पाण्याची बॉटल आढळून आली. तसेच बाजूलाच एक चिट्ठी आढळून आली असून त्यात, 'आम्ही दोघे जण आत्महत्या करत असल्याचे' नमूद करण्यात आलेले आहे. या घटनेची माहिती वाऱ्यासारखी परिसरात पसरली. यानंतर हे युवक - युवती औरंगाबाद येथून बेपत्ता असल्याची माहिती समोर आली. यावरून बदनापूर पोलिसांनी सिटी चौक पोलिस स्टेशनला माहिती दिली. यानंतर कोमलचा भाऊ बदनापूर येथे आला असता त्याने मृतदेह कोमल व शशांक यांचा असल्याचे सांगितले.
कोमल औरंगाबाद येथील एस. बी. महाविद्यालयात बी. कॉम. प्रथम वर्षाला शिकत होती. मुळची नांदगाव येथील असून औरंगाबाद येथे शिक्षणासाठी काकांकडे नारळीबाग येथे राहत असल्याची माहिती समजते. घटनास्थळाला पोलिस निरीक्षक रामेश्वर खनाळ, पोलिस उपनिरीक्षक अविनाश नळेगांवकर, बाबासाहेब गायकवाड, दिलीप जगदाळे यांनी भेट दिली. या बाबत बदनापूर पोलीस अधिक तपास करत आहेत.