गुन्हा दाखल झाला म्हणून केली आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2017 00:34 IST2017-12-17T00:34:48+5:302017-12-17T00:34:56+5:30
शासकीय कामकाजात अडथळा आणल्याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यामुळे लक्ष्मणनगर तांडा येथील एकाने शनिवारी विषारी द्रव प्राशन करून आत्महत्या केली

गुन्हा दाखल झाला म्हणून केली आत्महत्या
बदनापूर : शासकीय कामकाजात अडथळा आणल्याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यामुळे लक्ष्मणनगर तांडा येथील एकाने शनिवारी विषारी द्रव प्राशन करून आत्महत्या केली. दरम्यान, संबंधितांवर कारवाईच्या मागणीसाठी नातेवाईकांनी मृतदेह बदनापूर ठाण्यात आणल्यामुळे काही वेळ तणाव निर्माण झाला होता.
तालुक्यातील लक्ष्मणनगर तांडा येथील परमेश्वर मगन राठोड ( ३०) शनिवारी सकाळी विषारी द्रव प्राशन केले. नातेवाईकांनी त्यास तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यास तपासून मृत घोषित केले. मृताच्या नातेवाईकांनी परमेश्वर राठोड यांच्या आत्महत्येस शिक्षक जबाबदार असल्याचा आरोप करीत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. संतप्त ग्रामस्थांनी राठोड यांचा मृतदेह बदनापूर पोलीस ठाण्यासमोर ठेवल्याने काही वेळ तणाव निर्माण झाला होता. नातेवाईकांचा पवित्रा पाहून पोलिसांनी अंकुश राठोड यांच्या फिर्यादीवरून शिक्षक दत्तात्रय फटाले यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. मृत परमेश्वरने दोन वर्षांपूर्वी येथील जि.प. शाळेतील शिक्षक दत्तात्रय रंगनाथ फटाले (रा. कंडारी बु) याच्याकडून दीड लाख रुपये व्याजाने घेतले होते. पैकी दोन महिन्यांपूर्वी एक लाख २० हजार रूपये परत केले. शुक्रवारी फटाले यांनी आणखी एक लाख रूपयांची मागणी करून तू पैसे दिले नाही तर तुझ्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करीन, अशी धमकी दिली. बदनापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला, असे फिर्यादीत नमूद आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक बोलकर करीत आहेत
---------
काय आहे प्रकरण ?
लक्ष्मणनगर तांड्यावरील शाळेतील शिक्षक दत्तात्रय रंगनाथ फटाले यांच्या फिर्यादीवरून शुक्रवारी परमेश्वर राठोडविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणला म्हणून गुन्हा दाखल झाला होता. मुलीच्या गणवेशाचे पैसे का दिले नाही म्हणून शिवीगाळ करून मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद होते.