आस्था अग्रवाल हिचे यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:29 IST2021-02-12T04:29:04+5:302021-02-12T04:29:04+5:30
जालना : येथील आस्था आनंद अग्रवाल हिने नुकत्याच जाहीर झालेल्या सीए फाउंडेशन परीक्षांमध्ये ४०० पैकी ३२९ गुण मिळवून यश ...

आस्था अग्रवाल हिचे यश
जालना : येथील आस्था आनंद अग्रवाल हिने नुकत्याच जाहीर झालेल्या सीए फाउंडेशन परीक्षांमध्ये ४०० पैकी ३२९ गुण मिळवून यश संपादन केले. या यशाबद्दल तिचे ओमप्रकाश अग्रवाल, पुष्पादेवी अग्रवाल, संदीप अग्रवाल, मिरा अग्रवाल, अनिता अग्रवाल, आनंद अग्रवाल आदींनी कौतुक केले.
महिला लोकशाही दिनाचे आयोजन
जालना : महिला व बाल विकास विभागाकडून समस्याग्रस्त व पीडित महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व त्यांच्या हक्कांचे संरक्षण होऊन न्याय मिळावा, या हेतूने जिल्हा व तालुकास्तरावर महिलांसाठी विशेष लोकशाही दिन पाळण्याचे ठरवले आहे. त्यासाठी तालुकास्तरावर प्रत्येक तहसील कार्यालयात महिन्याच्या चौथ्या सोमवारी आणि जिल्हाधिकारी कार्यालयात दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येणार आहे. १५ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी ११ ते १२ वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले असून, महिलांनी आपली तक्रार दोन प्रतित जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय जालना येथे दाखल करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
शेतकऱ्यांचे विविध मागण्यांचे निवेदन
बदनापूर : तालुक्यात थकबाकी वसुलीसाठी वीजपुरवठा बंद केला जात आहे. हा बंद केलेला वीजपुरवठा त्वरित सुरू करावा तसेच शेतकऱ्यांना वीजबिल भरण्यासाठी आठ ते दहा दिवसांचा कालावधी देण्यात यावा, अशी मागणी आ. नारायण कुचे यांनी निवेदनाद्वारे वीजवितरण कंपनीचे जिल्ह्याचे अधीक्षक अभियंता हुमणे यांच्याकडे केली. यावेळी भाजपचे सरचिटणीस अनिल कोलते, माजी सभापती पद्माकर जºहाड, सरपंच राम पाटील, भगवान बारगाजे, गणेश बावणे, एकनाथ मोरे, योगेश कान्हेरे, शिवनाथ कान्हेरे, पांडुरंग भडांगे, नवनाथ शिरसाठ आदींची उपस्थिती होती.
‘त्या’ आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी
जालना : पाहेगाव येथील रमेश शेळके (५५) यांचा खून पैशांच्या देवाण-घेवाणीवरून झाल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अर्जुन बाबासाहेब दांडाईत, अभिमन्यू अर्जुन दांडाईत (दोघे रा. ब्राम्हणखेडा, ता. जि. जालना) या दोन संशयित आरोपींना बुधवारी ताब्यात घेतले होते. त्यांना बुधवारी सायंकाळी मंठा येथील न्यायालयात हजर केले असता, न्यायलयाने त्यांना १५ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.