ग्रामपंचायत निवडणुकीचा सोशल मीडियावर जोरदार प्रचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:42 IST2021-01-08T05:42:43+5:302021-01-08T05:42:43+5:30
रांजणी : चिन्ह वाटप झाल्यानंतर प्रचाराला सुरुवात झाली. विशेष म्हणजे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत युवकांकडून सोशल मीडियावरही निवडणुकीचा जोरदार ...

ग्रामपंचायत निवडणुकीचा सोशल मीडियावर जोरदार प्रचार
रांजणी : चिन्ह वाटप झाल्यानंतर प्रचाराला सुरुवात झाली. विशेष म्हणजे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत युवकांकडून सोशल मीडियावरही निवडणुकीचा जोरदार प्रचार केला जात आहे. उमेदवारांचे व्हिडिओ, ऑडिओ, सामाजिक कामे व्हायरल करून प्रचार केला जात आहे.
घनसावंगी तालुक्यातील ५६ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. ४ जानेवारी रोजी उमेदवारांना चिन्हांचे वाटप झाल्यानंतर प्रचारालाही गती आली आहे. तालुक्यातील ६४ पैकी ८ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. यात बोररांजणी, राजा टाकळी, बाचेगाव, देव हिवरा, मंगरूळ, भुतेगाव, कोठी, पाडुळी या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत सोशल मीडियाचा प्रभावी वापर होत असल्याचे दिसून आले. मात्र, ग्रामीण भागातील महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीतही सोशल मीडियाचा प्रभावी वापर उमेदवार करीत आहेत. सोशल मीडियातून होणाऱ्या या प्रचाराने ग्रामपंचायत निवडणुकीत आता चांगलीच रंगत आणली आहे. माणूस आपल्या हक्काचा, इतिहास घडविणार, अशा वेगवेगळ्या घोषवाक्यांचा वापर करून इच्छुक उमेदवार सोशल मीडियावर जोरदार प्रचार करीत आहेत. दुसरीकडे अनेक व्हिडिओ, ऑडिओ मिक्सिंग चित्रांची रेलचेल सोशल मीडियाच्या विविध माध्यमांवर दिसत आहे. काहींनी तर भावी सरपंचपद लावून जोरदार प्रचार सुरू केला आहे. त्यामुळे प्रचारात रंगत येत आहे.
४३ जण अजमावताहेत नशीब
रांजणी ग्रामपंचायतीच्या १७ सदस्य निवडीसाठी ४३ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. येथील अमोल देशमुख यांनी गावातील सर्व प्रभागांत १७ उमेदवार उभे केले आहेत. त्यांनी शक्तिप्रदर्शन करीत प्रचाराचा शुभारंभ केला, तर विरोधकांनीही मोठे शक्तिप्रदर्शन करीत प्रचाराचा धुराळा उडवून दिला आहे.