पट्ट्यातील बातम्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:30 IST2021-01-03T04:30:44+5:302021-01-03T04:30:44+5:30
कुंभार पिंपळगाव : भीमा- कोरेगाव शाैर्य दिनानिमित्त समता सैनिक दलाच्या वतीने शुक्रवारी कार्यक्रम घेण्यात आला. प्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर ...

पट्ट्यातील बातम्या
कुंभार पिंपळगाव : भीमा- कोरेगाव शाैर्य दिनानिमित्त समता सैनिक दलाच्या वतीने शुक्रवारी कार्यक्रम घेण्यात आला. प्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी रोहिदास शिंदे, सिद्धार्थ शिंदे, लिंबाजी शिंदे, डिगांबर शिंदे आदींची उपस्थिती होती.
व्यापारी महासंघाची कार्यकारिही जाहीर
मंठा : व्यापारी महासंघाची तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. जिल्हाध्यक्ष हस्तीमल बंब यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत तालुका अध्यक्षपदी बालासाहेब बोराडे यांची फेरनिवड, तर सचिवपदी पवन मणियार यांची निवड करण्यात आली. उर्वरित कार्यकारिणीत उपाध्यक्ष राधाकिसन बोराडे, सतीश गोरे, ओमप्रकाश टाके आदींचा समावेश आहे.
स्मशानभूमी परिसरात सिमेंटचे गट्टू
घनसावंगी : तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथील स्मशानभूमी परिसरात पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीमधून नुकतेच सिमेंटचे गट्टू बसविण्यात आले आहेत. यासाठी पंचायत समिती सदस्य अशोक उदावंत यांनी पुढाकार घेतला होता. यापूर्वीही स्मशानभूमी परिसरात मर्क्यूरी दिवे बसविण्यात आले होते.
धांडगे यांचा गौरव
घनसावंगी : राहेरा येथील आशा कार्यकर्ती अनिता धांडगे यांनी निबंध स्पर्धेत विशेष प्रावीण्य मिळविले आहे. याबद्दल तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नागेश सावरगावकर यांनी आशा दिनानिमित्त अनिता धांडगे यांचा गौरव केला. याबद्दल अनिता यांचे गाव परिसरातून स्वागत होत आहे. यावेळी अनेकांची उपस्थिती होती.
टेम्पो उलटला
बदनापूर : धान्य घेऊन जाणाऱ्या टेम्पोचे टायर फुटल्याने तो दुभाजकाला धडकून उलटल्याची घटना शहराजवळील महानुभाव आसरम येथे शुक्रवारी सकाळी घडली. सदरील टेम्पोमधून औरंगाबादकडून जालना येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी धान्य घेऊन जात असल्याची माहिती देण्यात आली.
मंठा शहरात गौरव कार्यक्रम
मंठा : आशा दिनानिमित्त तालुका वैद्यकीय अधिकारी कार्यालयात आशा स्वयंसेविकांचा गौरव करण्यात आला. वैद्यकीय अधीक्षक राजेंद्र गायके यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला. कार्यक्रमाला तालुका आरोग्य अधिकारी डॉ. दीपक लोणे, डॉ. स्वाती पवार, डॉ. मुक्ता जगले, डाॅ. जीवन मुरक्या, दत्ता सरकटे आदींची उपस्थिती होती. दरम्यान रांगोळी, गायन स्पर्धा घेण्यात आली.
कुत्र्यांचा उपद्रव
जालना : तालुक्यातील रामनगर परिसरात मागील काही दिवसांपासून मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. वेळीच मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे. अनेकदा मोकाट कुत्रे रस्त्याने पायी येणाऱ्या- जाणाऱ्यासह दुचाकीमागे लागतात. त्यामुळे अपघात घडण्याची भीती नाकारता येत नाही. तसेच अनेक कुत्र्यांना खरूज, अंगावरील केस गळून पडणे इ. आजार झाले आहेत.
काम संथगतीने
जालना : पीरपिंपळगाव येथील प्रा. आरोग्य केंद्राच्या नूतन इमारतीचे काम मागील काही महिन्यांपासून सुरू आहे; परंतु हे काम संथगतीने सुरू आहे. या कामासाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत निधी मंजूर झालेला आहे. पूर्वीच्या आ. केंद्राच्या इमारतीचे काम जीर्ण झालेले आहे. असे असतानाही अधिकारी, कर्मचाऱ्यांना त्याच इमारतीत काम करावे लागत आहे. वेळीच नूतन इमारतीचे काम पूर्ण करण्याची मागणी होत आहे.
बीडच्या घटनेचा निषेध
जालना : बीड येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील लिपिक अमर सोळंके परिवहनेतर कार्यालयात काम करताना त्यांना एका व्यक्तीने शिवीगाळ केली आहे. या घटनेचा जालना येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, कर्मचारी संघटनेतर्फे काम बंद ठेवून निषेध करण्यात आला. याप्रसंगी आर. आर. जाधव, के. एम. मस्के, आर. एन. आखाडे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.
गिराम यांचा गौरव
जालना : नाभिक सेवा संघाच्या (कर्मचारी) मराठवाडा अध्यक्षपदी ज्ञानेश्वर गिराम यांची नियुक्ती झाल्याबद्दल आ. राजेश राठोड यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला. नुकतीच ओबीसी बांधवांची बैठक झाली. यात २४ जानेवारीला जिल्हाधिकारी कार्यालयावर ओबीसी मोर्चा काढण्याबाबत नियोजन करण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते गिराम यांचा गौरव करण्यात आला.
परवान्याची मागणी
जालना : शहरातील फेरीवाल्यांना अधिकृत परवाना देण्यात यावा, अशा मागणीचे निवेदन आम आदमी पक्षाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. सद्य:स्थितीत शहरात फिरत असलेल्या फेरीवाल्यांकडे परवाना नाही. त्यामुळे त्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत असल्याचेही निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर जिल्हाध्यक्ष संजोग हिवाळे, अजित कोठारी, संजय कुलथे, जावेद बागवान, रफिक बागवान आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
मागण्यांचे निवेदन
जालना : नगर परिषदेतील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना जिल्हा कोषागार कार्यालयामार्फत निवृत्ती वेतन देण्यात यावे, अशी मागणी भारतीय स्वच्छकार एकता मंचच्या वतीने नगर विकास मंत्रालयाला पाठविण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. याबरोबरच इतर लाभासह शंभर टक्के अनुदान हे शासन मान्य करून त्याचीही सोय कोषागार कार्यालयातून देण्याबाबतचा निर्णय घ्यावा, असेही निवेदनात म्हटले असल्याचे सांगण्यात आले आहे.