पट्ट्यातील बातम्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:25 IST2021-01-02T04:25:46+5:302021-01-02T04:25:46+5:30
जालना : गोलापांगरी, गणेशनगर, काजाळा, अंतरवालासह परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी यंदा पारंपरिक पिकात बदल केला आहे. या परिसरातील काही शेतकऱ्यांनी ...

पट्ट्यातील बातम्या
जालना : गोलापांगरी, गणेशनगर, काजाळा, अंतरवालासह परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी यंदा पारंपरिक पिकात बदल केला आहे. या परिसरातील काही शेतकऱ्यांनी सूर्यफुलांचे पीक घेतले आहे. सध्या पिकाला ठिकठिकाणी सूर्यफूल लगडले असल्याने शेत शिवार पिवळेसर दिसत आहे.
किशोरवयीन आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्शन
मंठा : किशोरवयीन आरोग्य दिनानिमित्त शहरात राष्ट्रीय किशोरवयीन स्वास्थ्य कार्यक्रम नुकताच घेण्यात आला. यावेळी १० ते १९ वयोगटातील मुला- मुलींना समुपदेशन करण्यात आले. राम काळे यांनी आरोग्य आहार व किशोरवयीन वयात होणारे मानसिक व शारीरिक बदल याविषयी माहिती दिली. यावेळी आरोग्य सेविका एस. के. चव्हाण, सुनीता कास्टे आदींची उपस्थिती होती.
कृष्णा वाघ यांना सेवा गौरव पुरस्कार
भोकरदन : सुलक्ष्मी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था (औरंगाबाद) यांच्या वतीने माणुसकी समूहाच्या चतुर्थ वर्धापन दिनानिमित्त दिला जाणारा सेवा गौरव पुरस्कार पळसखेडा मुर्तड (ता. भोकरदन) येथील जिल्हा परिषद शाळेतील उपक्रमशील शिक्षक कृष्णा वाघ यांना नुकताच देण्यात आला. याबद्दल कृष्णा वाघ यांचे सर्वत्र स्वागत होत आहे.
मिसाळ यांचा गौरव
जाफराबाद : गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेल्या बाइकस्वार भारतीय सैन्य दलातील लान्स नायक गजानन मिसाळ यांचा जय मल्हार मित्र मंडळाच्या वतीने देऊळझरी गावात नुकताच गौरव करण्यात आला. या प्रसंगी मल्हार सेनेचे अध्यक्ष गणेश जारे, संदीप मिसाळ, अंभोरे, ज्ञानेश्वर जारे आदींची उपस्थिती होती.
त्या रांगोळीने वेधले लक्ष
जालना : औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक के. एम. मल्लिकार्जुन प्रसन्ना हे वार्षिक तपासणीसाठी जिल्हा दौऱ्यावर आले होते. दरम्यान पोलीस मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर स्मिता अकोले यांनी काढलेल्या महाराष्ट्र पोलिसांचा लोगो या रांगोळीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
स्वखर्चातून एक किलोमीटर रस्त्याचे काम
अंबड : तालुक्यातील नांदीवाडी ते वस्ती दरम्यान असलेल्या रस्त्याचे काम करण्याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने सामाजिक कार्यकर्ते नवाज पटेल यांनी स्वखर्चातून रस्त्याचे काम करून दिले आहे. मागील काही दिवसांपासून नांदीवाडी ते वस्ती दरम्यान असलेल्या जवळपास एक किलोमीटर रस्त्याची मोठी दुरवस्था झाली होती. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत होती.
आलमगाव येथे कार्यक्रम
अंबड : राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रमाअंतर्गत आलमगाव येथील राजुरेश्वर विद्यालयातील किशोरवयीन मुला- मुलींना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी वाढत्या वयातील शारीरिक, मानसिक बदल, संतुलित आहार, जंतुनाशक गोळ्या यासह विविध विषयांवर माहिती देण्यात आली. यावेळी सविता जाधव, आरोग्य सेविका एकता लाखे, लंका शेळके, पी. एस. पाटील, जे. के. झिंजुर्डे, आर. बी. बागल आदींची उपस्थिती होती.
मागण्यांचे निवेदन
परतूर : राज्यातील मुस्लिमांना राज्य सरकारने १० टक्के आरक्षण द्यावे, या प्रमुख मागणीचे निवेदन उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना समाज बांधवांच्या वतीने पाठविण्यात आले आहे. राज्यातील मुस्लिमांची सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक परिस्थिती अति मागास आहे. ही परिस्थिती पाहता मुस्लिमांना संविधानिक कायदा करून १० टक्के आरक्षण देण्यात यावे, असेही निवेदनात म्हटले आहे.
उमेश वैद्य प्रथम
मंठा : क्रीडा व युवक सेवा संचलनालयाच्या वतीने जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत विभाग स्तरावर घेण्यात आलेल्या ऑनलाईन युवक महोत्सवामध्ये उमेश वैद्य याने वीणा वादनात प्रथम क्रमांक मिळविला आहे. तर मृदंग वादन स्पर्धेत सचिन मोरे याने दुसरा क्रमांक मिळवून यश प्राप्त केले आहे. उमेश वैद्य हा संस्कार प्रबोधिनी गुरूकुलमधील विद्यार्थी असून, याबद्दल दोघांचेही कौतुक होत आहे.
रस्त्यावर खड्डे
जालना : शहरातून जाणाऱ्या जवाहरबाग चौक ते कन्हैयानगर चौफुली दरम्यान असलेल्या रस्त्यावर खड्डे पडले आहेत. या रस्त्यावरील खड्ड्यांचा रात्री- अपरात्री वाहनधारकांना अंदाज येत नसल्याने किरकोळ अपघातात वाढ होत चालली आहे. शहरात काही ठिकाणी झालेल्या सिमेंटच्या रस्त्याप्रमाणे हाही रस्ता तयार करण्यात यावा, अशी मागणी वाहनधारकांसह नागरिकांमधून होत आहे.
१०५ जणांचे रक्तदान
भोकरदन : जयेशभैया मित्र मंडळाच्या वतीने शहरात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात १०५ जणांनी रक्तदान केले. तर ४७५ रूग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रारंभी भिवपूर येथील शहीद जवान गणेश गावंडे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी नगराध्यक्ष मंजुषा देशमुख, राजाभाऊ देशमुख, चंद्रकांत दानवे, मुकेश चिने आदींची उपस्थिती होती.