पट्ट्यातील बातम्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 04:21 IST2021-01-01T04:21:03+5:302021-01-01T04:21:03+5:30

घनसावंगी : तालुक्यातील आंतरवाली दाई, भुतेगाव या गाव परिसरात मागील काही दिवसांपासून अवैधरित्या चढ्या दराने दारूची विक्री केली जात ...

Strip news | पट्ट्यातील बातम्या

पट्ट्यातील बातम्या

घनसावंगी : तालुक्यातील आंतरवाली दाई, भुतेगाव या गाव परिसरात मागील काही दिवसांपासून अवैधरित्या चढ्या दराने दारूची विक्री केली जात आहे. याकडे पोलीस प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावांमध्येही खुल्या पद्धतीने दारूची विक्री सुरू आहे.

बदनापुरात बसस्थानक नसल्याने प्रवाशांचे हाल

बदनापूर : बदनापूर हे तालुक्याचे ठिकाण आहे. असे असतानाही येथे बसस्थानक नसल्याने प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. शहरात बसस्थानक उभारण्याची गेल्या अनेक दिवसांपासून मागणी होत आहे. परंतु, याकडे संबंधितांचे दुर्लक्ष होत आहे. वेळीच येथे बसस्थानक उभारण्यात यावे, अशी मागणी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष अकरमखान पठाण यांनी केली आहे.

घनसावंगीत गर्दीत अडकली रूग्णवाहिका

घनसावंगी : तालुक्यातील ६२ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे अर्ज दाखल करण्यासाठी मागील दोन दिवसांपूर्वी येथील तहसील कार्यालय परिसरात मोठी गर्दी झाली होती. या गर्दीत एक रूग्णवाहिका अडकली होती. वेळीच उपस्थितांनी मध्यस्थी करून रूग्णवाहिकेला वाट मोकळी करून दिली. यावेळी रस्त्यावर मोठी वाहने उभी करण्यात आली होती.

१०० जणांचे रक्तदान

जालना : शहरातील पतंजली योग समितीच्या वतीने राबविण्यात आलेल्या विशेष रक्तदान मोहिमेत १०० जणांनी रक्तदान केले. पतंजली योग समितीने २७ नोव्हेंबर ते २७ डिसेंबर या कालावधीत विशेष जनजागृती मोहीम राबविली. या मोहिमेंतर्गत १०० महिला व पुरूष साधकांनी रक्तदान केले.

प्रवेश प्रक्रिया सुरू

जालना : जिल्ह्यातील आठ शासकीय आणि चार खाजगी अशा एकूण बारा औद्योगिक प्रशिक्षण संस्था आयटीआयच्या विविध व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी रिक्त असलेल्या जागांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. जिल्हास्तरीय समुपदेशन फेरीत प्रवेश प्रक्रिया पूर्ण केली जाणार असल्याची माहिती देण्यात आली.

बँकेसमोर शेतकऱ्यांचा रांगा

परतूर : मध्यंतरी झालेली अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातून खरीप पिके गेली आहेत. आता शेतकऱ्यांची सर्व मदार रबी पिकांवर आहे. या पिकांवरील रोगराई अटोक्यात आणण्यासाठी व पिकांना खते टाकण्यासाठी शेतकऱ्यांजवळ पैसा नसून, अनेक शेतकरी पीक कर्ज घेण्यासाठी बँका उघडण्यापूर्वीच बँकांसमोर रांगा लावत असल्याचे चित्र शहरात दिसून येत आहे.

दत्त जयंती साजरी

वडीगोद्री : अंबड तालुक्यातील सुखापुरी येथे दत्त जयंती नुकतीच विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. यावेळी श्री दत्त मंदिरात स्वाती दीदी यांचे भागवत कथा प्रवचन झाले. या प्रवचनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. तसेच कीर्तन, भारूड, भजन व महाप्रसाद याही कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासन नियमांचे पालन करून सर्व कार्यक्रम घेण्यात आले.

शिवसेनेची बैठक

जालना : जालना व बदनापूर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची आढावा बैठक नुकतीच घेण्यात आली. यावेळी माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर, जिल्हा प्रमुख भास्कर अंबेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी माजी आमदार संतोष सांबरे, उप जिल्हाप्रमुख पंडित भुतेकर, भगवान कदम, संतोष मोहिते, जयप्रकाश चव्हाण, हरिभाऊ पोहेकर आदींची उपस्थिती होती.

मार्गदर्शन कार्यक्रम

वालसावंगी : भोकरदन तालुक्यातील वालसावंगी येथे कृषी सहायक प्रेमनाथ काळे यांनी रबी पिकांबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी पुढील वर्षात कपाशीवरील बोंडअळी रोखण्यासाठी शेतकऱ्यांना कपाशीचे फरदड घेण्याचा मोह टाळावा, असे आवाहन केले. यंदा चांगला पाऊस झाल्याने भूगर्भातील पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. परिणामी गाव परिसरात रबीचा पेरा वाढलेला आहे.

शिक्षकांचा गौरव

वालसावंगी : भोकरदन तालुक्यातील वालसावंगी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे इम्तियाज शेख व इमरान यांची नुकतीच बदली झाली आहे. याबद्दल शाळेच्या वतीने त्यांचा गौरव करून निरोप देण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक अझहर पठाण, गायकवाड, सोनुने, कलीम, सपकाळ, शेवाळे आदींची उपस्थिती होती. सेवा कार्यकाळात ग्रामस्थांनी मोठे सहकार्य केले असल्याची माहिती इम्तियाज शेख यांनी दिली.

मतदान केंद्राची मागणी

वालसावंगी : येथील वॉर्ड क्रमांक सहासाठी असलेला वॉर्ड हा सुंदरवाडी येथे असून, हे गाव गावापासून दोन ते तीन किलोमीटरवर आहे. त्यामुळे मतदानासाठी जाणे- येणे करण्यासाठी मतदारांचा मोठा वेळ वाया जातो. यावर उपाय म्हणून सुंदरवाडी प्रभागात असलेल्या मतदारांसाठी गावात स्वतंत्र मतदान केंद्राची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी अनेकांची उपस्थिती होती.

ट्रॅक्टरवर कारवाई

अंबड : तहसील कार्यालयाच्या पथकाने माहेर भायगाव येथे वाळूने भरलेल्या ट्रॅक्टरवर कारवाई केली. यासाठी पथकाने देशगव्हाण येथील एका मळ्यात रात्रभर थंडीत मुक्काम करून बुधवारी सकाळी माहेर भायगाव येथे वाळूने भरलेल्या ट्रॅक्टरवर कारवाई केली. दरम्यान ट्रॅक्टर चालकाने तहसीलच्या गाडीवर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न केला होता. गेल्या काही दिवसांपासून अवैध वाळू वाहतूक सुरू असल्याची माहिती पथकाला मिळाली होती.

Web Title: Strip news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.