पट्ट्यातील बातम्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:19 IST2021-01-13T05:19:32+5:302021-01-13T05:19:32+5:30

जालना : गांधी चमन ते रेल्वे स्थानक दरम्यान असलेल्या रस्त्याची मागील अनेक दिवसांपासून दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर अनेक ठिकाणी ...

Strip news | पट्ट्यातील बातम्या

पट्ट्यातील बातम्या

जालना : गांधी चमन ते रेल्वे स्थानक दरम्यान असलेल्या रस्त्याची मागील अनेक दिवसांपासून दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर अनेक ठिकाणी लहान- मोठे खड्डे पडले असल्याने वाहनधारकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. वेळीच रस्त्याची दुरूस्ती करण्याची मागणी होत आहे.

अंबडमध्ये विविध सामाजिक उपक्रम

अंबड : पालकमंत्री राजेश टोपे यांच्या वाढदिवसानिमित्त येथील मत्स्योदरी महाविद्यालयामध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी प्रथम विद्यार्थ्यांना मास्कचे वाटप केले जाणार आहे. राष्ट्रीय सेवा योजना व क्रीडा विभागाच्या वतीने वृक्षारोपण, तर बुधवारी रक्तदान व तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

प्रचारासाठी सोशल मीडियाचा वापर

जालना : जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींच्या निवडणुका १५ जानेवारी रोजी होणार आहेत. या पार्श्वभूमीवर उमेदवार कमी दिवसांमध्ये जास्तीत - जास्त उमेदवारांपर्यंत पोहोचण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करीत आहेत. विशेषकरून तरूण पिढी याचा अधिकचा वापर करताना ग्रामीण भागात दिसून येत आहे.

पाच ग्रामपंचायती बिनविरोध

भोकरदन : तालुक्यातील ९१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांपैकी आजवर पाच ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. उर्वरित ग्रामपंचायतींमध्ये १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. शिवाय निवडणुकीसंदर्भात शासन स्तरावरील तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती देण्यात आली.

कोबीत जनावरे

जालना : मागील काही दिवसांपासून पालेभाज्यांचे दर घसरले आहेत. यात कोबी पिकावर केलेला खर्चही वसूल होत नाही. या विवंचनेत असलेल्या पिंपळगाव कोलते येथून जवळच असलेल्या गेवराई गुंगी येथील वाल्मिक तांबे यांनी कोबी पिकात जनावरे सोडली आहेत.

जामखेडात क्रीडा, निबंध स्पर्धा उत्साहात

जामखेड : येथील मत्स्योदरी विद्यालयात वक्तृत्व व निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमासाठी बी. बी. शेळके यांनी पुढाकार घेतला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक अरूण ठेंग होते. प्रमुख पाहुणे म्हणून दलावर शेख होते. कार्यक्रमासाठी तुकाराम भवर, महादेव माने आदींनी पुढाकार घेतला होता.

नदी पात्रात अस्वच्छता

भोकरदन : शहर परिसरात असलेल्या केळणा नदी पात्रात शहरातील सांडपाणी सोडण्यात आले आहे. शिवाय अनेकजण कचराही नदी पात्रात टाकत आहेत. यातच नदी पात्रात साचलेल्या पाण्यावर शेवाळ आले असून, त्याचा उग्र वास सुटला असल्याने परिसरात दुर्गंधी सुटली आहे. नदी पात्र वेळीच स्वच्छ करण्याची मागणी होत आहे.

लोकार्पण कार्यक्रम

अंबड : तालुक्यातील शहागड येथील राष्ट्रीय महामार्गाच्या चारही बाजूला सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसह एलईडी बसविण्यात आले आहेत. त्यासाठी लोकसहभाग घेण्यात आला. याचा लोकार्पण नुकताच करण्यात आला. याप्रसंगी उद्योजक अमिताभ भोसले, पोलीस उपनिरीक्षक हनुमंत वारे, संभाजी चोथे, विजय भोसले, निसार बागवान, मधुकर मापारी आदींची उपस्थिती होती.

हसनाबाद परिसरात तेलबियांच्या पिकात वाढ

हसनाबाद : भोकरदन तालुक्यातील हसनाबाद, पिंपळगाव, विटा, सावखेडा आदी गावांमध्ये यंदा तेल उत्पादन देणाऱ्या पिकांच्या पेऱ्यात काही प्रमाणात वाढ झाली आहे. या पिकांवर इतर पिकांच्या तुलनेत रोगराई कमी आहे. शिवाय पिकेही चांगली आली असल्याने उत्पादक शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. पारंपरिक पिकाला बाजारात भाव कमी मिळत असल्याने आम्ही तेलबिया पिकांकडे वळलो असल्याची माहिती शेख समीर व मनोज लाठी यांनी दिली.

मागण्यांचे निवेदन

जालना : कोरोनामुळे मागील अनेक दिवसांपासून बंद असलेले शासकीय वसतिगृह तत्काळ सुरू करण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन एसएफआयच्या वतीने सहाय्यक आयुक्तांना देण्यात आले. सध्या शासन नियमांचे पालन करून काही वर्ग सुरू झाले असल्याचेही सांगण्यात आले. निवेदनावर अनिल मिसाळ, अजित पंडित, पवन दांडगे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

२९ उमेदवार रिंगणात

बदनापूर : तालुक्यातील बाजार गेवराई ग्रामपंचायतीच्या ९ जागांसाठी २९ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे संपूर्ण तालुक्याचे लक्ष या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीकडे लागले आहे. सर्वच उमेदवार सोशल मीडियासह प्रत्यक्ष मतदारांच्या भेटी घेऊन विविध आश्वासने देत आहेत. मतदार राजा नेमका कुणाला पसंती देतो, हे मतदानानंतरच कळणार आहे.

अवैध दारू विक्री

देळेगव्हाण : जाफराबाद तालुक्यातील ग्रामीण भागात अवैध दारूविक्री व वाहतूक नेहमी चर्चेचा विषय आहे. त्यात सुरू असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदानापूर्वी अवैध दारू विक्री व वाहतूक सुरू आहे. टेंभुर्णी व जाफराबाद पोलिसांसमोर हे मोठे आव्हान आहे. सध्या अनेक गावांमधील वाड्या, वस्त्यांवर दारू विक्री सुरू आहे.

मजुरांची टंचाई

रोहिलागड : अंबड तालुक्यातील रोहिलागड परिसरात मागील काही दिवसांपासून मजुरांची टंचाई जाणवत आहे. सध्या रब्बी हंगामातील पिकांच्या खुरपणीसह फळपिकांच्या बागेमधील कामे सुरू आहेत. परंतु, मागणीच्या तुलनेत मजुरांची टंचाई गावात जाणवत आहे. वेळेवर मजूर मिळत नसल्याने अनेक शेतकरी कुटुंबांमधील सदस्यांकडून शेतातील कामे करून घेण्यावर भर देत आहेत.

Web Title: Strip news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.