पट्ट्यातील बातम्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:23 IST2021-01-10T04:23:04+5:302021-01-10T04:23:04+5:30

अंबड : तालुक्यातील ७१ ग्रामपंचायतींपैकी चार ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. अन्य ग्रामपंचायतींवर उमेदवारासह पॅनेल प्रमुखांनी आपल्या पॅनेलचा विजय होण्यासाठी ...

Strip news | पट्ट्यातील बातम्या

पट्ट्यातील बातम्या

अंबड : तालुक्यातील ७१ ग्रामपंचायतींपैकी चार ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. अन्य ग्रामपंचायतींवर उमेदवारासह पॅनेल प्रमुखांनी आपल्या पॅनेलचा विजय होण्यासाठी कंबर कसली आहे. यावेळी मतदारांना वेगवेगळी आश्वासने दिली जात आहेत.

सुखापुरी गावात प्रचाराला सुरूवात

वडीगोद्री : सुखापुरी येथे ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचाराला सुरूवात झाली आहे. येथील नऊ सदस्यांपैकी प्रभाग क्रमांक दोनमधील उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे अन्य सात उमेदवारांमध्येच ही निवडणूक होत आहे. प्रत्येकाने आपला विजय व्हावा, यासाठी कंबर कसली आहे. शिवाय जो-तो आपापल्या पद्धतीने प्रचार करत आहे.

अस्थिरोग तपासणी शिबिर

जालना : रोटरी क्लब ऑफ जालना मिडटाऊनकडून मंठा चौफुली परिसरातील एका रूग्णालयात मोफत अस्थिरोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात डॉ. मोनिका धनानी यांनी मणक्याचे आजार, सांधेदुखी, अर्धांगवायू, आखडलेले सांधे आदीवर मार्गदर्शन केले. या शिबिराचा नागरिकांनी लाभ घेतला.

पिकांवर रोगराई

बदनापूर : मागील तीन ते चार दिवसांपासून बदनापूर तालुक्यात ढगाळ वातावरण आहे. या बदललेल्या वातावरणाचा हरभरा पिकाला मोठा फटका बसला आहे. सध्या हरभऱ्याला फुले लागली असून, हरभऱ्यावर फूल अळीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी चिंतेत आहेत.

बिले रखडली...

अंबड : तालुक्यातील अनेक खासगी माध्यमिक शिक्षकांची वैद्यकीय बिले गेल्या काही महिन्यांपासून रखडली आहेत. ही बिले निधी नसल्याने दिली जात नसल्याचे सांगण्यात येत आहेत. ही बिले वेळीच मार्गी लावावीत, अशी मागणी शिक्षकांमधून होत आहे.

बहुजन रि. प.ची २३ जानेवारीला शहरात यात्रा

जालना : केंद्र व राज्य शासनाच्या प्रश्नांवर जनमत निर्माण करून शासनाला धोरणे ठरवून निर्णय घेण्यासाठी बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पक्षाच्यावतीने राज्यव्यापी जनसंघर्ष यात्रा काढण्यात येणार आहे. ही यात्रा दिनांक २३ जानेवारी रोजी शहरात दाखल होणार आहे. दरम्यान, शहरातील आनंदनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर येथे सभा व गीतांचा कार्यक्रम होणार आहे.

प्राथमिक तपासणी

परतूर : तालुक्यातील ३८ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शासन स्तरावरून तयारी पूर्ण झाली आहे. या अनुषंगाने जवाहर नवोदय विद्यालयात निवडणुकीसाठी आवश्यक साहित्याची प्राथमिक तपासणी करण्यात आली. यावेळी तहसीलदार रूपा चिकत्र यांच्यासह ७९ कर्मचारी उपस्थित होते.

व्यवहार पारदर्शक

अंबड : सुखापुरी येथील ग्रामपंचायतीमध्ये आपले सरकार केंद्र कार्यान्वित असून, या केंद्राच्या माध्यमातून ई-ग्रामसुराज्य या पोर्टलवर ग्रामपंचायतीच्या सर्व नमुन्यातील माहिती ऑनलाईन करण्यात येत आहे. या माध्यमातून ग्रामपंचायतीचा आर्थिक व्यवहार पारदर्शकपणे पार पाडला जात आहे. यापूर्वी ग्रामपंचायतीला चांगला कर मिळालेला आहे.

राष्ट्रीय महामार्ग कामाची पाहणी

अंबड : जालना- अंबड - वडीगोद्री या राष्ट्रीय महामार्गाच्या कामाची पाहणी पालकमंत्री राजेश टोपे यांनी केली. अंबड ते वडीगोद्री राष्ट्रीय महामार्गाचे काम बऱ्याच दिवसांपासून रखडले होते. या रस्त्याचे काम तत्काळ व दर्जेदार करण्याबाबत राजेश टोपे यांनी अधिकारी व कंत्राटदारांना सूचना केल्या. यावेळी नगरसेवक काकासाहेब कटारे, अफरोज पठाण, शिवप्रसाद चांगले, अर्जुन भोजने, अविनाश वडगावकर, कैलाश भोरे, तक्की सिद्दीकी, हाजी मणियार, नितीन राठी आदी उपस्थित होते.

व्यवसाय प्रशिक्षण

बदनापूर : तालुक्यातील निकळक येथे दुग्ध व्यवसाय व शेळीपालन याबाबत दोनदिवसीय प्रशिक्षण घेण्यात आले. हे प्रशिक्षण परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, कृषी विज्ञान केंद्र (बदनापूर) व मॉ. फाऊंडेशन (नाशिक) यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आले. विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ फारूक तडवी यांनी मार्गदर्शन केले.

बेशिस्त पार्किंग

भोकरदन : शहरातील रस्त्यांलगत वाहनधारक जागा मिळेल तेथे दुचाकीसह चारचाकी वाहने पार्किंग करत आहेत. त्यामुळे रहदारीला अडथळा निर्माण होत असून, वेळोवेळी वाहतूक कोंडी होत आहे. नियमबाह्य पद्धतीने रस्त्यालगत वाहने लावणाऱ्यांवर भोकरदन पोलिसांनी कडक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.

रस्त्याची दुरवस्था

मान देऊळगाव : मान देऊळगाव ते दगडवाडी या तीन किलोमीटर रस्त्याची मागील काही दिवसांपासून दुरवस्था झाली आहे. या रस्त्याचे काम वेळीच करण्यात यावे, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे. विशेष म्हणजे चार वर्षांपूर्वी या रस्त्याच्या कामाचे उद्घाटन प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत झाले होते. परंतु, काम झाले नसल्याची माहिती देण्यात आली.

मागण्यांचे निवेदन

तळणी : मंठा तालुक्यातील तळणी येथील रमाई नगरात सिमेंट रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे करण्यात आले आहे. नियमानुसार व अंदाजपत्रकाप्रमाणे हे काम झालेले नसून, संबंधित अभियंत्याने टक्केवारी घेतल्यामुळे कामाचा दर्जा घसरला आहे, अशी तक्रार किशोर सदावर्ते यांनी मंठा पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांकडे शुक्रवारी निवेदनाद्वारे केली आहे.

Web Title: Strip news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.