पट्ट्यातील बातम्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:25 IST2021-01-09T04:25:03+5:302021-01-09T04:25:03+5:30
घनसावंगी : तालुक्यातील सरफगव्हाण येथे भगवाण राधा- कृष्ण, महादेव, नंदी व तुकाराम महाराज यांच्या मूर्तीची नुकतीच स्थापना करण्यात आली. ...

पट्ट्यातील बातम्या
घनसावंगी : तालुक्यातील सरफगव्हाण येथे भगवाण राधा- कृष्ण, महादेव, नंदी व तुकाराम महाराज यांच्या मूर्तीची नुकतीच स्थापना करण्यात आली. मूर्ती स्थापनेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे तीन दिवस आयोजन करण्यात आले होते.
धान्य दुकानदारांची परतूर शहरात बैठक
परतूर : पुरवठा विभागाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांसह स्वस्त धान्य दुकानदारांची शहरात नुकतीच बैठक झाली. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी रिना बसैय्ये यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजना व एपीएल केशरी शेतकरी शिधापत्रिकेतील लाभार्थ्यांना मोबाईल व आधार क्रमांक सिडींग करण्याचे सांगण्यात आले.
भारतीय जैन संघटनेच्या राज्य पुरस्काचे वितरण
जालना : भारतीय जैन संघटनेच्या ऑनलाईन राज्यस्तरीय अधिवेशनात उत्कृष्ट कार्य पुरस्काराची घोषणा करण्यात आली होती. यात जिल्हाध्यक्ष अशोक संचेती, सचिव शिखरचंद लेहाडे, अतुल बिनायकिया यांची निवड करण्यात आली होती. या पुरस्काराचे वितरण नुकतेच करण्यात आले. यावेळी हस्तीमल बंब, पवन सेठिया आदींची उपस्थिती होती.
अर्जासाठी मुदतवाढ
जालना : कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांनी एकाच अर्जाच्या माध्यमातून घ्यावा, यासाठी कृषी विभागाच्या वतीने महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज घेण्यात येत आहेत. या पोर्टलवर अर्ज करण्यासाठी आता ११ जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
पुरस्कार प्रदान
जालना : कल्याणी एज्युकेशन सोशल वेलफेअर सोसायटी (नांदेड) यांच्या वतीने अंजानी आई फाऊंडेशनला क्रांतिज्योती स्त्रीभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सावित्रिबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त हा पुरस्कार देण्यात आला. अंजानी फाऊंडेशनचे जालन्यात मोठे सामाजिक कार्य आहे.
अंकुशनगरमध्ये रक्तदान शिबीर
अंकुशनगर (महाकाळा) : अंबड तालुक्यातील अंकुशनगर (महाकाळा) येथे घेण्यात आलेल्या आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिरात ४० जणांनी रक्तदान केले. उद्घाटन सुधाकर चिमणे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास मुख्याध्यापक पंढरीनाथ अटकळ, प्रा. भगवान बरसाले, किशोर डावकर, शिवाजी गायके, राजेंद्र गाडेकर आदींची उपस्थिती होती.
अध्यक्षपदी अंभोरे
मंठा : बहुजन समाज पक्षाच्या मंठा तालुकाध्यक्षपदी बबनराव अंभोरे यांची नियुक्ती करण्यात आली. बहुजन समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष रमेश उबाळे आणि जिल्हा उपाध्यक्ष नितीन मोरे यांनी बबनराव अंभोरे यांना नियुक्तीपत्र दिले आहे. तालुक्यात बहुजन समाज पक्ष मजबूत करण्याच्या दृष्टीने अंभोरे यांची नियुक्ती करण्यात आली.
...अखेर तो खांब हटविला
परतूर : शहरातील भाजी मंडई परिसरात मागील काही दिवसांपासून मोडकळीस आलेला विद्युत खांब अखेर हटविण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे. सदरील मोडकळीस आलेला विद्युत खांब वर्दळीच्या ठिकाणी होता. त्यामुळे अपघाताची भीती होती, त्यामुळे खांब हटविण्याची मागणी होत होती.
सांडपाणी रस्त्यावर
जामखेड : अंबड तालुक्यातील जामखेड गावातील रस्त्यावर सांडपाणी येत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत नागरिकांनी ग्रामविकास अधिकारी के. के. कल्याणकर यांच्याकडे तक्रार करून रस्त्यावर येणाऱ्या पाण्याचा प्रश्न निकाली काढावा, अशी मागणी केली आहे. विशेष म्हणजे, ही समस्या गावातील सर्वच वॉर्डांमध्ये असल्याचे सांगण्यात आले.
संघटकपदी बगडिया
जालना : संभाजी ब्रिगेडच्या जालना शहर संघटकपदी मुरारी बगडिया तर कायदेशीर सल्लागार म्हणून रविकुमार सूर्यवंशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष विजय वाडेकर यांनी बगडिया व सूर्यवंशी यांना नियुक्तीचे पत्र दिले आहे. आपले सामाजिक कार्य पाहून ही नियुक्ती करण्यात येत असल्याचेही दिलेल्या नियुक्तीपत्रात म्हटले आहे.
कार्यकारिणी जाहीर
अंबड : मराठा उद्योजक लॉबी जिल्हा कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. यात जिल्हाध्यक्षपदी विजय मिसाळ, जिल्हा उपाध्यक्षपदी सुनील डोंगरे यांची निवड करण्यात आली. मराठवाडा संपर्कप्रमुख राजेंद्र औताडे, राहुल बारवकर, सुनील गावंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत निवडण्यात आलेल्या कार्यकारिणीत भगवान परकाळे, शरद भोसले, अशोक माकोडे आदींचा समावेश आहे.
मागण्यांचे निवेदन
जालना : तत्कालीन सरकारच्या काळात शहरातील सिड्स पार्कमध्ये जागा उपलब्ध करून देण्याबाबत घोषित करण्यात आले होते. सदरील जागा उपलब्ध करून देण्यात यावी, या मागणीचे निवेदन महाराष्ट्र बीजोत्पादक असोसिएशनच्या वतीने उपजिल्हाधिकारी केशव नेटके यांना देण्यात आले. यावेळी रामप्रसाद मुंदडा, काबरा, शेरेकर, दायमा आदींची उपस्थिती होती.