पट्ट्यातील बातम्या १
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:28 IST2021-01-18T04:28:05+5:302021-01-18T04:28:05+5:30
जालना : परतूर तालुक्यातील फुलवाडी येथे एकावर धारदार शस्त्राने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली आहे. ...

पट्ट्यातील बातम्या १
जालना : परतूर तालुक्यातील फुलवाडी येथे एकावर धारदार शस्त्राने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली आहे. फुलवाडी वस्ती येथे बद्रीनारायण शामराव वाघमारे यांच्यावर शस्त्राने वार करून गंभीर जखमी केले आहे. त्यांच्यावर प्रथम आष्टी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करून जालना येथे रेफर करण्यात आले होते. या प्रकरणी आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
टेंभुर्णी गावातील आठवडी बाजार रद्द
टेंभुर्णी : ग्रामपंचायत निवडणुकीची मतमोजणी सोमवारी होत असल्याने टेंभुर्णी येथील सोमवारचा आठवडी बाजार रद्द करण्यात आला आहे. जाफराबाद तालुक्यातील १७ ग्रामपंचायतीच्या निवडणुका शुक्रवारी पार पडलेल्या या निवडणुकांचा निकाल सोमवारी तहसील कार्यालयात घोषित होणार आहे. त्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, म्हणून तालुका दंडाधिकारी सतीश सोनी यांनी तालुक्यातील आठवडी बाजार बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.
जालन्यात आज ताम्हण-पळी बजाव आंदोलन
जालना : शासन-प्रशासन दरबारी दुर्लक्षित आणि खितपत पडलेल्या ब्राह्मण समाजाच्या मागण्यांसाठी सातत्याने आंदोलने सुरू आहेत. त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याने शासनाला जागे करण्यासाठी ताम्हण-पळी बजाव आंदोलन जालना येथे सोमवारी करण्यात येणार आहे. समाजाने या आंदोलनात जास्तीत-जास्त संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन ब्राह्मण समाज संघर्ष समितीचे मुख्य समन्वयक दीपक रणनवरे यांनी केले.
सचिवपदी रामप्रसाद खरात
तीर्थपुरी : अखिल भारतीय काँग्रेस कमिटी सोशल मीडिया विभागाच्या महाराष्ट्र प्रदेश सचिव म्हणून घनसावंगी तालुक्यातील मंगरुळ येथील रामप्रसाद खरात यांची निवड झाली आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटी सोशल मीडीया विभागाचे अध्यक्ष रोहन गुप्ता यांच्या आदेशानुसार, तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या मान्यतेने सोशल मीडिया प्रदेशाध्यक्ष अभिजीत सपकाळ यांनी ही निवड केली आहे. या निवडीचे स्वागत केले जात आहे.
कुंभार पिंपळगावात गुरुवारपासून खुल्या क्रिकेट स्पर्धा
कुंभार पिंपळगाव : घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथे २१ जानेवारीपासून जिजाऊ जन्मोत्सव निमित्त खुल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धांचे आयोजन शंकर मैदान तीर्थपुरी रोड येथे करण्यात आले आहे. विजेत्या संघास शाम उढाण, दिलीप राऊत व सुधीर आर्दड यांच्याकडून रुपये २२ हजार २२२ पारितोषिक तर उपविजेता संघाला शिवाजी कंटूले, अशोक गायकवाड व विश्वजित तौर यांच्याकडून रुपये ११ हजार १११ पारितोषिक, तसेच मॅन ऑफ द सीरिज खेळाडूला रुपये १,१११ हे पारितोषिके जाहीर करण्यात आले आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या घनसावंगी तालुक्यातील इच्छुक संघांनी हरी कंटुले, विजय मिसाळ, शिवाजी तौर, नवनाथ सपकाळ, पवन पांचाळ व सोनाजी कंटुले यांच्याशी संपर्क साधून, आपल्या संघाचा प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन करण्यात आले.