रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:21 IST2021-07-16T04:21:34+5:302021-07-16T04:21:34+5:30
नागरिकांची गैरसोय घनसावंगी : शहरांतर्गत विविध भागातील पथदिवे बंद पडले आहेत. पथदिवे बंद असल्याने रात्रीच्या वेळी नागरिकांची गैरसोय होत ...

रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
नागरिकांची गैरसोय
घनसावंगी : शहरांतर्गत विविध भागातील पथदिवे बंद पडले आहेत. पथदिवे बंद असल्याने रात्रीच्या वेळी नागरिकांची गैरसोय होत आहे. शिवाय भुरट्या चोऱ्या ही मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. याचाही नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. पालिकेने बंद पडलेले पथदिवे सुरू करावेत, अशी मागणी होत आहे.
महिला, बालकांच्या पुनर्वसनाबाबत बैठक
जालना : कोरोना संसर्गजन्य परिस्थितीत अनेक अडचणींचा सामना करणाऱ्या महिला व बालकांच्या पुनर्वसन मदतीसाठी राज्यभर नेटवर्क उभे राहत आहे. जालना जिल्ह्यातील कार्यकर्त्यांसाठी ऑनलाईन मार्गदर्शन करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते, शिक्षणतज्ज्ञ हेरंब कुलकर्णी यांच्या पुढाकाराने जालना जिल्ह्यातील विविध संस्थांनी सर्वेक्षण काम हाती घेतले आहे. या बैठकीत याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
विस्कळीत सेवेमुळे मोबाईल धारक त्रस्त
परतूर : शहरासह ग्रामीण भागातील बीएसएनएलची सेवा पूर्णतः विस्कळीत झाली आहे. मोबाईलवर एकमेकांना संपर्क साधताना अडचणी येत आहेत. शिवाय इंटरनेट सेवेचा पूर्णतः बोजवारा उडाला आहे. इंटरनेट अभावी शासकीय, निमशासकीय कामकाजावरही मोठा परिणाम झाला आहे. याकडे संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.
मच्छिंद्रनाथ चिंचोलीत धान्य शिबिर
घनसावंगी : तालुक्यातील मच्छिंद्रनाथ चिंचोली येथे आयोजित धान्य शिबिराला नागरिकांचा प्रतिसाद मिळाला. महंत योगिराज कैलासनाथ महाराज यांच्या संजीवनी समाधी धान्य योग ज्ञानपीठ येथे नुकतेच बाल शिबिर झाले. या शिबिरासाठी व्यवस्थापक नरेंद्र पाटील, प्रियंका पगारे, स्वामी निरंजन महाराज, अरविंद घोगरे, संदीप रनमळे यांनी परिश्रम घेतले.
बाजारपेठेत गर्दी, सूचनांचे उल्लंघन
घनसावंगी : डेल्टा प्लसच्या पार्श्वभूमीवर शासनाने निर्बंध कडक केले आहेत. परंतु, शहरातील बाजारपेठेत नागरिकांची गर्दी कायम आहे. अनेकजण विनामास्क फिरत आहेत. शिवाय इतर प्रशासकीय सूचनाही पायदळी तुडविली जात आहेत. रात्री उशिरापर्यंत अनेकांचे व्यवहार सुरू राहत आहेत. याकडे प्रशासकीय पथकाने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.
कामगारांना साहित्य वाटप
तीर्थपुरी : घनसावंगी तालुक्यातील रामसगाव येथे पालकमंत्री राजेश टोपे यांच्या प्रयत्नातून बांधकाम कल्याण मंडळाच्या वतीने २७० कामगारांना बांधकाम साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी सरपंच प्रशांत भालेकर, नकुल भालेकर, प्रकाश भालेकर, प्रल्हाद भोजने, प्रवीण भोजने, राहुल भालेकर, चंद्रशेखर भोजने, नरहरी हिवाळे आदी उपस्थित होते.
कारवाईची मागणी
बदनापूर : शासनाने गुटखा विक्री, वाहतुकीवर कायदेशीर बंदी घातली आहे. परंतु, बंदी घातलेल्या गुटख्याची शहरासह ग्रामीण भागात अवैधरीत्या विक्री सुरू आहे. पानटपऱ्या, हॉटेलसह किराणा दुकानातून ही गुटखा विक्री केला जात आहे. याकडे संबंधितांनी लक्ष देऊन कारवाई मोहीम राबवावी, अशी मागणी होत आहे.