साहेब काहीही करा...साखर कारखाना सुरू करा : जिल्हाधिकाऱ्यांना साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:35 IST2021-08-25T04:35:28+5:302021-08-25T04:35:28+5:30
राज्य सहकारी बँकेचे या कारखान्यावर केवळ ११ कोटी रुपयांचे कर्ज होते आणि त्याचे व्याज मिळून ते २८ कोटी रुपयांवर ...

साहेब काहीही करा...साखर कारखाना सुरू करा : जिल्हाधिकाऱ्यांना साकडे
राज्य सहकारी बँकेचे या कारखान्यावर केवळ ११ कोटी रुपयांचे कर्ज होते आणि त्याचे व्याज मिळून ते २८ कोटी रुपयांवर पोहोचले होते. त्याामुळे हे कारण देत हा कारखाना साधारपणे २०१३ मध्ये विक्री करण्यात आला.
औरंगाबाद येथील एका बड्या उद्योजकाने या कारखान्याची खरेदी केली तेव्हा हा कारखाना सुरू होईल अशी आशा होती. परंतु आता आठ वर्षांनंतर कारखाना सुरू करण्याबाबत कुठल्याच हालचाली न झाल्याने शेतकऱ्यांच्या आशा मावळल्या आहेत. अत्यंत कमी कर्ज असताना या कारखान्याची विक्री झाल्याचे सांगण्यात आले. सध्या येथील कारखाना परिसरात असलेला कारखान्याचा आत्मा म्हणेच बॉयलर तोडण्याचे काम सुरू असल्याचे सांगण्यात आले. परंतु कोणालाही कारखान्यात जाऊ दिले जात नसल्याने याबद्दल सविस्तर माहिती मिळत नसल्याचे यावेळी सांगण्यात आले. या शिष्टमंडळाचे म्हणजे जिल्हाधिकारी राठोड यांनी काळजीपूर्वक ऐकून या बाबत मला पाहिजे ती माहिती मागवून त्यावर अधिकाऱ्यांचा अभिप्राय घेऊन नंतर योग्य तो निर्णय आपण देऊ, असे सांगितले. या सर्व प्रकरणांची चौकशी करावी, अशी मागणीदेखील शिष्टमंडळाने केल्याचे सांगण्यात आले. या कारखान्यांचे बदनापूर आणि जालना तालुक्यातील मिळून जवळपास साडेसात हजार सभासद असल्याची माहिती निवेदनात देण्यात आली आहे.
या शिष्टमंडळात परशुराम मोहिते, आर.आर. खडके, ज्ञानेश्वर भांदरगे, सोपानराव भांदरगे, डी. के. मोरे, रावसाहेब पवार, ज्ञानेश्वर तौर, ज्ञानेश्वर कदम, ज्ञानेश्वर डुकरे, सुभाष कोळकर, अंकुकशराव राऊत, अंकुशराव देशमुख, लक्ष्णण शिंदे, लक्ष्मण घाेडके यांच्या अन्य पदाधिकाऱ्यांचा सहभाग होता.
चौकट
हातवन प्रकल्पामुळे आशा उंचावल्या
जालना तालुक्यातील हातवन येथे जवळपास एक हजार कोटी रुपये खर्च करून मोठा साठवण तलाव दुधना नदीवर होणार आहे. त्यासाठी ३०० कोटी रुपयांचा निधी मिळाला असून, भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे. हा तलाव झाल्यास या भागातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळून ऊस लागवड वाढू शकते. त्या काळात कुठलीही सिंचन व्यवस्था नसतांना कारखाना क्षेत्रात शेतकऱ्यांनी उस लावला होता.
चौकट
जिल्ह्यात अतिरिक्त ऊस
आज जिल्ह्यात अतिरिक्त ऊसाचा प्रश्न गंभीर बनला आहे. विशेष म्हणजे अंबड आणि घनसावंगी तालुक्यात मोठ्या प्रमाणावर उसाची लागवड करण्यात आली आहे. या भागातील समर्थ, सागर तसेच परतूर तालुक्यातील बागेश्वरी, समृध्दी साखर कारखान्याने मोठ्या प्रमाणावर उसाचे गाळप करूनही ऊस शिल्लक आहे. जर जालना सहकारी कारखाना सुरू असता, तर त्यांना ऊसाची कमी सध्या तरी जाणवली नसती असे सांगण्यात आले.