दुष्काळी योजनांचा आढावा घेणार शिवसेनेची समिती!
By Admin | Updated: August 28, 2016 00:17 IST2016-08-28T00:08:28+5:302016-08-28T00:17:21+5:30
जालना : चार वर्षांपासून दुष्काळाचा सामना करणाऱ्या जालना जिल्ह्यासह मराठवाड्यात राज्य सरकारने दुष्काळ निवारणार्थ विविध योजना जाहीर केल्या होत्या.

दुष्काळी योजनांचा आढावा घेणार शिवसेनेची समिती!
जालना : चार वर्षांपासून दुष्काळाचा सामना करणाऱ्या जालना जिल्ह्यासह मराठवाड्यात राज्य सरकारने दुष्काळ निवारणार्थ विविध योजना जाहीर केल्या होत्या. या योजनांच्या अंमलबजावणीसह इतर योजनांची माहिती शिवसेनेचे मंत्री, खासदार आणि आमदारांची समिती घेणार आहे. १ ते ३ सप्टेंबर या काळात हा आढावा घेण्यात येणार आहे.
राज्य आणि केंद्रात सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेने दुष्काळीस्थिती शिवजलक्रांतीसह इतर योजना पक्षपातळीवर राबवून शेतकरी आणि लोकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर राज्य सरकारने दुष्काळ निर्मूलनार्थ विविध योजना जाहीर केल्या होत्या. याची अमलबजावणी योग्यरितीने झाली नसल्याची ओरड होत होती. त्यातच अनेक विद्यार्थ्यांना अद्याप शुल्क माफी देण्यात आलेली नाही. याचप्रमाणे इतर योजनांची अशीच अवस्था असल्याने जिल्ह्यातील विविध योजनांचा आढावा घेण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला आहे. त्यानुसार पक्षाचे मंत्री, खासदार आणि आमदारांची समिती हा आढावा घेणार आहे. यामध्ये राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई, गृहराज्यमंत्री दीपक केसरकर, जिल्हा संपर्क नेते आ. विनोद घोसाळकर, खा. प्रताप जाधव, आ. सुरेश धानोरकर, आ. राजाभाऊ वाझे, आ. अनिल कदम, आ. योगेश घोलप, आ. अनिल बाबर, आ. शशिकांत खेडेकर यांचा समावेश राहणार आहे. १ ते ३ सप्टेंबर या काळात ही समिती जिल्ह्याचा दौरा करणार असून, जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे यांची बैठक घेऊन जिल्हा प्रशासनाच्या विविध योजनांच्या कामाचा आढावा घेणार आहे.
दुष्काळ निवरणासाठी शिवसेनेने सुचविलेल्या उपाययोजना व मदत कार्याबद्दल सूचनांची अमलबजावणी शासकीय यंत्रणाकडून झाली अथवा नाही, शिवजलक्रांती योजनेतील कामांची सद्यस्थिती व जलसाठ्याची स्थिती, जनतेशी संवाद ही समिती साधणार आहे. (प्रतिनिधी)
शिवसेनेच्यावतीने दुष्काळात राबविण्यात आलेल्या शिवजलक्रांती अभियानातून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जलसंधारणाची कामे करण्यात आली. यात प्रामुख्याने शिवकालीन बंधाऱ्यांचे पुनरुज्जीवन, नदी तसेच नाल्यांचे खोलीकरण करण्यात आले. या शिवजलक्रांती अभियानामुळे बंधाऱ्यांत मुबलक असा पाणीसाठा झालेला आहे. शिवजलक्रांतीमुळे जिल्ह्यातील हजारो हेक्टर शेतीला या पाण्याचा लाभ होईल. शिवाय विहिरी, कुपनलिकांच्या पाणीपातळीतही समाधानकारक वाढ झाली आहे.
जिल्ह्यात दुष्काळस्थिती शिवजलक्रांती योजनेद्वारे शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न पक्षाच्या माध्यमातून केला. त्यामुळे अनेक गावांचा पाण्याचा प्रश्न बऱ्याच अंशी सुटला आहे. या योजनेसह राज्य शासनाने जाहीर केलेल्या योजनांचा आढावा शिवसेनेची मंत्री, खासदार आणि आमदारांची समिती घेणार आहे.
- अर्जुन खोतकर, राज्यमंत्री (दुग्धविकास, वस्त्रोद्योग व मत्स्यविकास)
दुष्काळ निर्मूलनार्थ राज्य सरकारने अनेक योजना जाहीर केल्या. मात्र, त्याची अंमलबजावणी योग्य रित्या झाली नसल्याची सामान्यांची ओरड आहे. तसेच इतर लोककल्याणकारी योजनांची हीच अवस्था आहे. म्हणूनच पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार शिवसेनेच्या समितीकडून हा आढावा घेण्यात येणार आहे.
- भास्कर अंबेकर, जिल्हाप्रमुख, शिवसेना, जालना.