‘त्या’ बेपत्ता पोलीस कर्मचाऱ्यास घेतले ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:35 IST2021-07-14T04:35:25+5:302021-07-14T04:35:25+5:30
जालना : तालुक्यातील सेवली येथील पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले जमादार तुकाराम राठोड यांनी दोन दिवसांपूर्वी आत्महत्या करत असल्याची ...

‘त्या’ बेपत्ता पोलीस कर्मचाऱ्यास घेतले ताब्यात
जालना : तालुक्यातील सेवली येथील पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले जमादार तुकाराम राठोड यांनी दोन दिवसांपूर्वी आत्महत्या करत असल्याची चिठ्ठी लिहून ठाण्यातून बेपत्ता झाले होते. या प्रकारामुळे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली होती. तुकाराम राठोड यांचा शोध घेण्यासाठी सर्वत्र बिनतारी यंत्रणेवरून सूचना देण्यात आल्या होत्या.
पोलिसांनी प्रारंभी राठोड यांचा शोध त्यांच्या मुलीसह अन्य नातेवाइकांकडे घेतला. रविवारी मध्यरात्री ते मुलीकडेही गेले होते. परंतु नंतर त्यांनी मंठा तालुक्यातील मेसखेडा येथील मित्राकडे आपला मुक्काम हलविला. वरिष्ठ पोलीस अधिकारी विलास मोरे यांच्या नेतृत्वाखाली हा तपास करण्यात आला. मोरे यांना राठोड हे मेसखेडा येथे असल्याची खबर मिळाली. त्यांनी तेथे पोलीस पाठवून राठोड यांना ताब्यात घेऊन परिवाराकडे सोपविले.
राठोड यांनी ही आत्महत्या करण्याची चिठ्ठी ठाण्यातील वरिष्ठ अधिकारी तसेच आरोपींकडून होणाऱ्या जाचाला कंटाळून लिहिली असल्याचे प्रथमदर्शनी पोलिसांनी केलेल्या चौकशीत पुढे आले आहे. दरम्यान, राठोड यांना शोधण्यात यश आल्यानंतर पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.